वाशीम,
cheque dishonour case चार लाख रुपयांच्या धनादेश अनादर प्रकरणात दाखल झालेल्या खटल्यात वाशीम येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी मतीन अहमद खान यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याचा निकाल अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डि. यु. राजपूत यांनी दिला असून, आरोपीतर्फे अॅड. ए. ए. पठाण यांनी बाजू मांडली.

प्रकरणातील माहितीनुसार, मूळ फिर्यादी शेषाप्पा पुंजाप्पा आलमवार (रा. शिव चौक, वाशीम) यांच्याकडून आरोपी मतीन अहमद खान (वय ५६, रा. अस्ताना, कारंजा लाड) यांनी व्यवसायासाठी आणि लोकांची कर्जे फेडण्यासाठी नोव्हेंबर २०१८ मध्ये चार लाख रुपये हातउसने घेतले होते, असा आरोप होता. सदर रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने दि अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा कारंजा येथील चार लाख रुपयांचा धनादेश (क्रमांक ०३४८३७) दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजी दिला होता. फिर्यादीने सदर धनादेश वाशीम अर्बन बँकेतील खात्यात जमा केला असता, खात्यावर पुरेसा निधी नसल्याने ८ फेब्रुवारी २०१९ रोजी तो अनादर होऊन परत आला.त्यानंतर फिर्यादीने २० फेब्रुवारी २०१९ रोजी कायदेशीर नोटीस पाठवली. सदर नोटीस आरोपीला २६ फेब्रुवारी २०१९ व २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मिळाली. तरीही रकमेचा भरणा न झाल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात ५ एप्रिल २०१९ रोजी चलनक्षम दस्तऐवज अधिनियम १८८१ चे कलम १३८ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल केली होती.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान मूळ फिर्यादी शेषाप्पा आलमवार यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे वारसदार सदानंद शेषाप्पा आलमवार यांनी हा खटला पुढे चालविला. आरोपीने न्यायालयात बचाव घेताना सांगितले की, कोणताही उसनवारी व्यवहार झालेला नसून बीसीच्या कामासाठी सुरक्षिततेपोटी दिलेला कोरा धनादेश वापरून ही खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे.cheque dishonour case फिर्यादी पक्षाच्या उलटतपासणीत, चार लाख रुपयांची रक्कम कधी आणि कशी दिली याचा कोणताही ठोस कागदोपत्री पुरावा किंवा स्वतंत्र साक्षीदार न्यायालयात सादर होऊ शकला नाही. तसेच फिर्यादीची आर्थिक क्षमता व उसनवारी व्यवहाराची सत्यता याविषयी वाजवी संशय निर्माण करण्यात आरोपी पक्षाला यश आले. फिर्यादी पक्ष कायदेशीर वसुलीपात्र देणे सिद्ध करण्यास अपयशी ठरल्याचे स्पष्ट करत, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डि. यु. राजपूत यांनी ५ नोव्हेंबर २०२६ रोजी निकाल देत आरोपी मतीन अहमद खान यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपीतर्फे अॅड. ए. ए. पठाण (हिवरा रोहिला) यांनी काम पाहिले व त्यांना अॅड. के. एस. हजारे, अॅड. गझनफर खान आणि अॅड. शाहीद खान यांनी सहकार्य केले.