गोंदिया जिल्ह्यात बोअरवेल खोदकाम व खोलीकरणावर बंदी ban-on-drilling borewells

आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई, जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
गोंदिया
ban-on-drilling borewells जिल्ह्यातील भूजलसाठ्याचे संवर्धन, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्याच्या संपूर्ण शहरी व ग्रामीण क्षेत्रात नवीन बोअरवेल (विंधन विहीर) खोदकाम तसेच सध्या असलेले बोअरवेल अधिक खोल करण्यास पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

borewell
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार घरगुती पिण्याच्या पाण्याची गरज, अस्तित्वातील विहिरींची देखभाल आणि अत्यावश्यक कामांसाठी निश्चित अटी व शर्तींच्या अधीन राहून परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांना अर्जांची छाननी, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून परवानगी देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. नवीन बोअरवेल किंवा कुपनलिका खोदणे तसेच अस्तित्वातील बोअरवेल अधिक खोल करणे यावर सर्वसाधारणपणे बंदी राहणार आहे. ही बंदी शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग, व्यावसायिक आस्थापना, संस्था तसेच बोअरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार, रिगमालक व यंत्रचालक यांना लागू राहील. पिण्याच्या पाण्यासाठीच्या विहिरी व बोअरवेलच्या बाबतीतही आदेशातील निर्धारित परवानगी प्रक्रिया आणि अटींचे पालन करणे बंधनकारक असेल. तर सर्वसामान्य नागरिकांना घरगुती पिण्याच्या पाण्याच्या वापरासाठी नवीन बोअरवेल किंवा कुपनलिका खोदायची असल्यास संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. अशा खोदकामासाठी २०० फूट (६० मीटर) खोलीची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच खासगी कारणासाठी पिण्याच्या पाण्याकरिता बोअरवेल खोदण्यापूर्वी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या वरिष्ठ वैज्ञानिकांकडून भूजल उपलब्धता प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
 
अस्तित्वातील विहिरींचे खोलीकरण, स्वच्छता, त्यातील गाळ, माती, कचरा व इतर अडथळे काढणे तसेच पाण्याचा उपसा सुरळीत होण्यासाठी आवश्यक किरकोळ देखभाल व दुरुस्तीची कामेही उपविभागीय अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीनेच करता येतील. नागरिक, शेतकरी, व्यावसायिक, बोअरवेल व्यावसायिक आणि संबंधित सर्व यंत्रणांनी आदेशातील निर्बंध व अटींचे पालन करावे. हा आदेश तात्काळ प्रभावाने पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, विद्यमान बोअरवेलमधून पिण्याच्या पाण्याचा नियमित वापर करण्यास कोणतीही बंदी घालण्यात आली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.