बांगलादेशी क्रिकेटपटू शादमन इस्लाम गंभीर जखमी

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
सिल्हेट,
shadman-islam-seriously-injured बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान बांगलादेशचा फलंदाज शादमन इस्लाम गंभीर जखमी झाला. दुखापतीमुळे त्याला स्वतःच्या पायावर चालणेही शक्य झाले नाही. अखेर वैद्यकीय पथकाने स्ट्रेचरच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे बांगलादेशच्या संघाची चिंता वाढली आहे.
 
shadman-islam-seriously-injured
 
वेस्ट इंडिजचा संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना सिल्हेट येथे सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजच्या डावातील ७८व्या षटकात चेंडूचा पाठलाग करताना शादमन इस्लामचा पाय घसरला. मैदानावर मोठ्या प्रमाणात दव असल्याने त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. यावेळी त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. वेदना असह्य झाल्याने तो मैदानावरच विव्हळताना दिसला.
 
दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेता त्याला मैदानाबाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला स्वतःच्या पायावर उभे राहणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे मैदानावर स्ट्रेचर मागवण्यात आले. त्यानंतर स्ट्रेचरच्या मदतीने त्याला बाहेर नेण्यात आले. पुढील वैद्यकीय तपासणीसाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात येणार आहे. मात्र, स्कॅनचा अहवाल अद्याप समोर आलेला नाही.
 
दरम्यान, सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने ३०० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. बांगलादेशचा फलंदाजीचा डाव सुरू होईल, तेव्हा शादमन खेळण्यासाठी उपलब्ध असेल की नाही, हे स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे, त्याने मागील कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याची दुखापत बांगलादेशसाठी मोठा धक्का मानली जात आहे. शादमनची दुखापत गंभीर असल्यास त्याला केवळ या कसोटी सामन्यालाच नव्हे, तर आगामी सामन्यांनाही मुकावे लागू शकते. त्यामुळे एमआरआय अहवालाकडे आता बांगलादेशच्या संघासह चाहत्यांचे लक्ष लागले आहे.