कॅबचालकाच्या हत्याकांडाने बंगळूरू हादरले!

सात जणांच्या हत्येची आरोपीची कबुली

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
बंगळूरू,
Bengaluru shaken by cab driver's murder बंगळूरूमध्ये कौटुंबिक वादातून घडलेल्या कथित सामूहिक हत्याकांडाने मोठी खळबळ उडाली आहे. इंदुशेखर असे आरोपी कॅबचालकाचे नाव असून, त्याने स्वतःची पत्नी आणि सासरच्या कुटुंबातील सहा सदस्य अशा एकूण सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, इंदुशेखर आणि त्याची पत्नी सुनीता यांच्यात वारंवार वाद होत होते. सुनीता सतत माहेरच्या मंडळींच्या संपर्कात राहत असल्याने इंदुशेखर नाराज होता. पत्नीबाबतच्या तक्रारी तो सासू आणि मेहुण्यांकडे करत असे; मात्र प्रत्येक वेळी ते सुनीताची बाजू घेत असल्याने त्याचा संताप वाढत गेला. याच कौटुंबिक वादातून त्याने हत्येचा कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेतील मृतांमध्ये पत्नी सुनीता, सासू रूपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, भावजय दिव्या आणि नलिनी तसेच शिवकुमारचा सात वर्षांचा मुलगा पुनीत यांचा समावेश आहे.
 
 
 
4657679
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपीने सर्वप्रथम पत्नी सुनीताची हत्या केली. त्यानंतर दोन्ही मेहुण्यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावले. शिवकुमार आणि शंकर यांच्यासह सासू रूपावती, भावजय दिव्या आणि नलिनी तसेच चिमुरड्या पुनीतलाही त्याने लक्ष्य केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यात दगडाचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. हत्या केल्यानंतर मृतदेह कारमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन टाकल्याचेही तपासात समोर आले आहे. घटनास्थळावरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी रसायनांचा वापर करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तींसंदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला. इंदुशेखरची चौकशी करताना त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. अखेर त्याने सात जणांची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
 
आरोपीने दिलेल्या माहितीच्या आधारे नंदी हिल्सच्या पायथ्याशी पोलिसांनी शोधमोहीम राबवली. सुमारे चार तास चाललेल्या या मोहिमेत सात वर्षांच्या पुनीतचा मृतदेह पोलिसांना आढळला. मात्र, अन्य सहा जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील मृतदेहांची विल्हेवाट नेमकी कुठे लावण्यात आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी वेस्ट यांच्या नेतृत्वाखाली तीन विशेष पोलीस पथके स्थापन करण्यात आली आहेत. आरोपीने दिलेल्या माहितीची पडताळणी करत उर्वरित सहा जणांचा शोध सुरू असून, या सामूहिक हत्याकांडामागील संपूर्ण घटनाक्रम उघड करण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.