बुलडाणा,
chikhli-pocso-case-verdictअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी चिखली येथील सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे या नराधमाला २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ए. जी. संतानी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२, बुलढाणा यांनी एक महत्त्वपूर्ण निकाल देत आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास ३ महिन्यांची अतिरिक्त साधारण कारावासाची शिक्षा भोगावी लागेल. तसेच दंडाची ही रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्रकरणाची हकीकत अशी की, १४ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास चिखली येथे घडली. आठ वर्षांची पीडित मुलगी चिखली येथे घरी एकटी असताना, आरोपी सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे याने तिच्या घरी येऊन जबरदस्तीने हात धरून तिला त्याच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यापूर्वी सुद्धा आरोपीने पीडितिचे ३ ते ४ वेळा अमानुषरित्या गैरकृत्य केले होते. पीडितेची आई अशिक्षित असल्याने व मानसिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे या घटनेची फिर्याद चिखली येथील समाजसेविका यांनी दिली. चिखली येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पो.स्टे. चिखली येथे भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोसो कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यालयात खटला चालवताना सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सोनाली सावजी देशपांडे यांनी एकूण सात साक्षीदार तपासले. यामध्ये फिर्यादी, पीडिता, पीडितेची बहीण, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने कायद्यांतर्गत पोसो आरोपी सिद्धेश्वर पुंडलिक इंगळे रा. चिखली यास दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच, अतिरिक्त नुकसानभरपाईसाठी सदर प्रकरण विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा येथे वर्ग करण्यात आले आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील श्रीमती सोनाली सावजी-देशपांडे यांनी बाजू मांडली, तर तपास अधिकारी म्हणून पोउपनि शरद भागवतकर यांनी आणि कोर्ट पैरवी म्हणून पोहेकॉ. नंदा राम इंगळे यांनी कामकाज पाहिले