मानोरा,
diwali shopping दिवाळी सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपल्याने शहरातील बाजारपेठ ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर व्यापार्यांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग सुरू आहे. शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेतील दुकाने आकर्षक साहित्याने सजली आहेत. लक्ष्मीदेवीचे फोटो, मूर्ती, मातीच्या पणत्या, रंगीबेरंगी दिवे, आकर्षक तोरणे, शोभेचे हार, आकाश कंदील, विद्युत रोषणाईच्या माळा, झाडू, किराणा साहित्य आणि कपड्यांच्या दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. मात्र, यंदा दुष्काळाच्या सावटामुळे बाजारपेठेत खरेदीचा उत्साह असला तरी ग्राहकांकडून खर्च करताना हात आखडता घेतला जात असल्याचे चित्र दिसत आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचा दीर्घ खंड पडला. परिणामी, पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन शेतकर्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली. अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तालुयाची बाजारपेठ प्रामुख्याने ग्रामीण भागातील ग्राहकावर अवलंबून असल्याने शेतकर्यांच्या आर्थिक परिस्थितीचा थेट परिणाम व्यापारी वर्गावरही झाला आहे. शेतकर्यांच्या हातात पैसा नसल्याने शेतमजूर आणि ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी सणाच्या उत्साहापेक्षा आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून साजरी केली जात असल्याचे चित्र आहे. दिवाळीच्या निमित्ताने नागरिक घरगुती सजावटीच्या वस्तू, पूजासाहित्य आणि कपड्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.diwali shopping पारंपरिक मातीच्या पणत्यांसोबतच आकर्षक रंगांतील दिवे, सजावटीच्या वस्तू, विद्युत माळा, आकाशकंदील आणि घराच्या रोषणाईसाठी लागणार्या साहित्याला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी महिला व पुरुषांची बाजारपेठेत गर्दी होत आहे. व्यापार्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तूंची मांडणी केली आहे.
बाजारपेठेत वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दाखल होत आहेत. अनेक ग्राहक आपली दुचाकी वाहने थेट बाजारपेठेतील रस्त्यांवर उभी करीत असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. वाहनांच्या गर्दीमुळे पादचार्यांनाही रस्त्यावरून मार्ग काढणे कठीण झाले आहे. पोलिस प्रशासनाने बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, बाजारपेठेतील सध्याची परिस्थिती पाहता वाहतूक नियंत्रणाचा अभाव जाणवत आहे. मुख्य बाजारपेठेत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी आणि वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.