देशातील पहिल्या पथदर्शी प्रकल्पासाठी जिल्हास्तरीय समिती गठित

सारस संवर्धनासाठी घाटटेमनी पथदर्शी प्रकल्प, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
गोंदिया
sarus-crane-conservation सारस पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवण्यासह भातशेती परिसरातील जैवविविधतेचे जतन करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी आमगाव तालुक्यातील घाटटेमनी येथे पथदर्शी नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीत कृषी, वन, संशोधन आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांसह प्रगतिशील शेतकरी प्रतिनिधींचा समावेश आहे.
 
saras
सारस पक्ष्यांचा अधिवास प्रामुख्याने भातशेती परिसराशी निगडित असल्याने या परिसरातील पर्यावरणीय संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर कमी करून नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब वाढविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. त्यातून सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि शेतजमिनीतील जैवविविधतेचे संरक्षण साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. घाटटेमनी येथे राबविण्यात येणार्‍या या प्रकल्पांतर्गत शेतकर्‍यांना नैसर्गिक शेतीचे तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी प्रात्यक्षिक क्षेत्रे, आदर्श गावे आणि लाभार्थी शेतकर्‍यांची निवड करण्यासाठी समिती मार्गदर्शन करणार आहे. गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ, हलोल येथील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने प्रशिक्षण, क्षेत्रभेटी आणि अभ्यासदौरेही आयोजित केले जाणार आहेत. जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून, मुख्यमंत्री कार्यालयाचे कृषी अर्थतज्ज्ञ तथा वरिष्ठ सल्लागार डॉ. परशराम पाटील यांच्यासह वन विभाग, कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ, बीएनएचएस सेवा संस्था आणि प्रगतिशील शेतकरी प्रतिनिधींचा समितीत समावेश आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
समितीची जबाबदारी ....
सारस संवर्धनाशी सुसंगत नैसर्गिक शेतीचा जिल्हाभर विस्तार करण्यासाठी समिती कृती आराखडा तयार करणार आहे. कृषी व वन विभागासह संबंधित संस्थांमध्ये समन्वय साधणे, प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेणे आणि यशस्वी शेतकर्‍यांच्या अनुभवांचा इतर शेतकर्‍यांपर्यंत प्रसार करणे, अशी जबाबदारीही समितीवर सोपविण्यात आली आहे.
पर्यावरणपूरक कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण...
प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दरमहा बैठक घेण्यात येणार आहे. सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि शेतकर्‍यांसाठी शाश्वत शेतीचा पर्याय या दोन्ही उद्दिष्टांची सांगड घालणारा घाटटेमनी येथील हा पथदर्शी प्रकल्प गोंदिया जिल्ह्याच्या पर्यावरणपूरक कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.