चीन-लडाख सीमेवर भूकंपाचा धक्का!

जम्मू-काश्मीरमध्येही जाणवले हादरे

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
शिनजियांग,
Earthquake strikes China-Ladakh border चीनमधील शिनजियांग परिसरात गुरुवारी रात्री १० वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.० इतकी नोंदवण्यात आली. चीन-लडाख सीमेजवळ या भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती समोर आली आहे. ‘काश्मीर वेदर’च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र ३५.५८७ अंश उत्तर अक्षांश आणि ७८.१३० अंश पूर्व रेखांशावर होते. जमिनीपासून १६४ किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याचे सांगण्यात आले. या धक्क्यांची जाणीव जम्मू-काश्मीरमधील काही भागांतही झाली. मात्र, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत कोणतीही मोठी हानी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नव्हते.
 
 
 
gt6u776
दरम्यान, गुरुवारी देशातील अन्य भागांतही कमी तीव्रतेच्या भूकंपांची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) माहितीनुसार, सायंकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी लक्षद्वीप समुद्र परिसरात ३.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्याआधी सायंकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी दिल्लीजवळील फरिदाबाद येथे २.९ रिश्टर तीव्रतेचा धक्का नोंदवण्यात आला. या दोन्ही भूकंपांची तीव्रता तुलनेने कमी असल्याने सामान्यतः असे धक्के नागरिकांना जाणवत नाहीत. दुसरीकडे, गेल्या काही महिन्यांपासून तिबेटचे पठार आणि हिमालयाच्या आसपासच्या भागांत भूकंपीय हालचाली वाढल्याचे निरीक्षण नोंदवले जात आहे. यापूर्वी २२ ऑक्टोबर रोजी तिबेटमध्ये ७.० रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. भारताच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, या भूकंपाचे केंद्र ल्हासापासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर होते, तर त्याची खोली १७३ किलोमीटर नोंदवण्यात आली होती.