पाटण्यात एन्काऊंटर; तीन आरोपी ठार!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
पाटणा,
encounter-in-patna-three-accused-killed बिहारची राजधानी पाटणा येथे पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये झालेल्या चकमकीत तीन गुन्हेगार ठार झाले आहेत. मृतांमध्ये पॅक्स अध्यक्षांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान मनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीही गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. ही घटना मनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेरपूर गंगा घाट परिसरात घडली.
 
encounter-in-patna
 
मिळालेल्या माहितीनुसार, शेरपूर गंगा घाट परिसरात काही फरार गुन्हेगार लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांचे पथक आरोपींना पकडण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलिसांची कारवाई सुरू होण्यापूर्वीच गुन्हेगारांनी पथकाच्या दिशेने गोळीबार केला. या हल्ल्यात मनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. या चकमकीत तिन्ही गुन्हेगारांना गोळ्या लागल्या आणि त्यांचा मृत्यू झाला.
 
ठार झालेले तिन्ही आरोपी पॅक्स अध्यक्षांच्या हत्या प्रकरणात वॉन्टेड होते. त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर्तिकेय के. शर्मा यांनी दिली. दानापूर आणि शाहपूरसह अन्य पोलीस ठाण्यांमध्येही त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल होते. या आरोपींचा यापूर्वीच्या अनेक गुन्ह्यांमधील सहभागही तपासात समोर आला होता.
 
घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे पथक दाखल झाले असून, चकमकीशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून संपूर्ण घटनाक्रमाचा तपास केला जात आहे. तसेच या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. दरम्यान, पटना जिल्ह्यात यापूर्वीही पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये चकमक झाली होती. जुलै महिन्यात मसौढी येथे अपहरणकर्ते आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत एका आरोपीचा मृत्यू झाला होता.