वर्धा
migratory-bird हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणाऱ्या मध्य आशियाई स्थलांतरित पक्ष्याने वर्धेत हजेरी लावली आहे. मुकुटधारी पर्णवटवट्याची जिल्ह्यात प्रथम छायाचित्र नोंद झाली आहे. पक्षीनिरीक्षक प्रतिक पाल यांनी सेवाग्रामच्या ग्रामीण परिसरात पक्षीनिरीक्षणादरम्यान या पक्ष्याचे निरीक्षण केले. या नोंदीची ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक संकेतस्थळ असलेल्या ’ई-बर्ड’ वर नोंद करण्यात आली.
मुकुटधारी पर्णवटवट्या हा आकाराने लहान आणि प्रामुख्याने किटकांवर उपजीविका करणारा पक्षी आहे. त्याचा प्रजनन अधिवास पश्चिम हिमालय आणि मध्य आशियातील अफगाणिस्तान, उझबेकिस्तान यासारख्या प्रदेशात आहे. हिवाळ्यात हा पक्षी स्थलांतर करून भारतीय उपखंडात येतो.
डोक्यावरील ठळक फिकट रंगाची पट्टी, पंखांवरील दोन पांढुरक्या पट्ट्या आणि डोळ्यांभोवतालची वैशिष्ट्यपूर्ण रचना यामुळे या पक्ष्याची ओळख पटते. वर्धा जिल्ह्यातील या पहिल्या नोंदीमुळे जिल्ह्याच्या पक्षिवैविध्यात आणखी एका स्थलांतरित पक्ष्याची भर पडली आहे. वर्धेत विविध अधिवासांमध्ये स्थानिक पक्ष्यांसोबतच दूरवरून येणारे स्थलांतरित पक्षीही आश्रय घेत असल्याचे या नोंदीतून अधोरेखित होते.