पटियालाजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसचे चार डबे पेटले; रेल्वे प्रशासन घटनास्थळी

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
पटियाला,
Four coaches of the Karmabhoomi Express caught fire पंजाबमधील पटियाला येथे कर्मभूमी एक्स्प्रेसच्या चार डब्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली. राजपुरा रेल्वे स्थानकाजवळील सराय बंजारा गावाच्या परिसरात ही दुर्घटना घडली. अमृतसरहून न्यू जलपाईगुडीच्या दिशेने जाणाऱ्या या रेल्वेगाडीला आग लागल्यानंतर तातडीने थांबविण्यात आले. डब्यांमधून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. जीव वाचविण्यासाठी अनेक प्रवाशांनी आपले सामान सोडून रेल्वेतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते.
 
 

Karmabhoomi Express  
 
आगीची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. सुरुवातीला या दुर्घटनेत काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नॉर्दर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू शेखर उपाध्याय यांनी कोणतीही जीवितहानी किंवा प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त फेटाळले. त्यामुळे सुरुवातीच्या जखमींबाबतच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हिमांशू शेखर उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, सराय बंजारा स्थानकाजवळ रेल्वेगाडीची सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गाडी सुरक्षितपणे थांबविण्यात आली. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू असून, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.