गेल्या वर्षीपेक्षा सोने १२.४ टक्क्यांनी महाग!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
Gold is 12.4 percent धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांना यंदा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सणाच्या दिवशीही मौल्यवान धातूंच्या किमतीतील तेजी कायम असून, दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ नोंदवण्यात आली. ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव तब्बल २ हजार २०० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १ लाख ४८ हजार ८०० रुपयांवर पोहोचला आहे. गुरुवारी हाच दर १ लाख ४६ हजार ६०० रुपये होता. दुसरीकडे, चांदीच्या दरातही प्रतिकिलो १ हजार ५०० रुपयांची वाढ झाली असून, चांदी आता १ लाख ९४ हजार ५०० रुपयांवर पोहोचली आहे. मागील व्यवहाराच्या दिवशी चांदीचा भाव १ लाख ९३ हजार रुपये होता.
 
 

Gold is 12.4 percent
 
गेल्या वर्षीच्या धनत्रयोदशीशी तुलना केली असता यंदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. मागील वर्षी १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख ३२ हजार ४०० रुपये होता. तर चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ७० हजार रुपये होता. त्या तुलनेत यंदा सोने तब्बल १६ हजार ४०० रुपयांनी महागले असून, त्याच्या किमतीत सुमारे १२.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. Monarch PMS चे सहायक निधी व्यवस्थापक ध्रुव जोगलेकर यांच्या मते, मागील वर्षीच्या धनत्रयोदशीनंतर सोन्याच्या किमतीत सुमारे १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या खरेदीच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
 
 
दरम्यान, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दागिने खरेदीसाठी सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत आहे. ज्वेलर्स, घाऊक व्यापारी आणि किरकोळ ग्राहकांकडून होणारी वाढती खरेदी ही सोन्या-चांदीच्या दरवाढीमागील प्रमुख कारणे मानली जात आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या किमतीतील वाढ आणि गुंतवणूकदारांकडून सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याला दिले जाणारे प्राधान्य यामुळेही दरांना आधार मिळत आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून पाहतात. परिणामी, वाढती मागणी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये तेजी कायम आहे.