Gold Price Prediction:दोन लाख रुपयांवर पोहोचणार १ तोळा सोनं?

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |

मुंबई,
gold-price-prediction-2027धनत्रयोदशीच्या दिवशी आज सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण पाहायला मिळाली आहे. अमेरिकन शेअर बाजारातील मोठी घसरण, पश्चिम आशियातील जहाजांवर झालेले नवे हल्ले, कच्च्या तेलातील तेजी आणि व्याजदरांबाबत बदलणारे वातावरण, यामुळे गुंतवणूकदारांच्या भूमिकेवर परिणाम झाला आहे.
 

gold prediction  
 
एका क्षेत्रातील नुकसान भरून काढण्यासाठी गुंतवणूकदार सोन्या-चांदीतील नफा काढून घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते, अल्प मुदतीत सोन्याच्या दरात चढ-उतार राहू शकतात, परंतु दीर्घ मुदतीत सोन्याचा कल तेजीचाच राहील. 'मनीकंट्रोल'च्या वृत्तानुसार, पुढील एका वर्षात सोने २० ते ४० टक्क्यांनी महाग होऊ शकते. पुढील धनत्रयोदशीपर्यंत सोन्याचे भाव कुठे पोहोचणार? 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' चे सचिव सुरेंद्र मेहता यांच्या मते, अल्प कालावधीसाठी सोन्याच्या दरांचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, वर्षभराच्या दृष्टीकोनातून सोन्यात ३० ते ४० टक्क्यांची वाढ होऊ शकते. जर भाव ४० टक्क्यांनी वाढले, तर सोने प्रति १० ग्रॅम २ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज त्यांनी वर्तवला.
 
दुसरीकडे, 'ऑगमोंट'च्या चीफ रिसर्च ऑफिसर रेनिषा चेनानी यांच्या अंदाजानुसार, MCX वर सोन्याचे भाव पुढील धनत्रयोदशीपर्यंत प्रति १० ग्रॅम सुमारे १.७५ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतात. सध्याच्या सुमारे १.४५ लाख रुपये दराच्या तुलनेत ही २० टक्क्यांची वाढ असेल. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ४,९५० डॉलर प्रति औंसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ९४.५ च्या आसपास राहणे आणि सोन्यावरील १५ टक्के आयात शुल्क, या घटकांमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची दरवाढ कायम राहू शकते.
 
सोन्यातील तेजीची मुख्य कारणे
मध्यवर्ती बँकांची मोठी खरेदी: जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्याने खरेदी सुरू आहे. तिसऱ्या तिमाहीत मध्यवर्ती बँकांनी ३२१ टन सोने खरेदी केले, जे गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी जास्त आहे. याशिवाय, 'गोल्ड ETF'मधील गुंतवणूक वाढून ती विक्रम ४,२५६ टनांवर पोहोचली आहे.
 
सोन्यातील तेजीला ब्रेक कसा लागेल?
सोन्याच्या किमतीतील संभाव्य तेजीसमोर काही धोकेही आहेत. जर अमेरिकेत महागाई दीर्घकाळ उच्च पातळीवर राहिली किंवा फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले, तर सोन्याच्या तेजीला ब्रेक लागू शकतो. याशिवाय, भारतीय रुपया मजबूत झाल्यास देशांतर्गत बाजारात सोन्याची दरवाढ मर्यादित राहू शकते.