चेन्नई,
Hussey enters Australian team चेन्नई सुपर किंग्सची साथ सोडल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसी आता नव्या भूमिकेत क्रिकेटच्या मैदानात परतणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी अधिकृत निवेदन जारी करत हसीची आगामी महत्त्वाच्या स्पर्धांसाठी सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली. २०२७ मध्ये होणारी ॲशेस मालिका आणि एकदिवसीय विश्वचषक यांसाठी तो ऑस्ट्रेलियन संघाच्या व्यवस्थापनाला मार्गदर्शन करणार आहे. आगामी विश्वचषकासाठी सक्षम आणि संतुलित संघ उभारण्याच्या प्रक्रियेत त्याचा अनुभव महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे, त्याची नियुक्ती केवळ एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटपुरती मर्यादित नसून टी-२० संघालाही तो मार्गदर्शन करणार आहे.

२०२८ मध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासह त्याच वर्षी लॉस एंजेलिस येथे आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही हसी ऑस्ट्रेलियन संघाचा सल्लागार असेल. चेन्नई सुपर किंग्समध्ये तो आयपीएल २०२६ पर्यंत फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी चेन्नई सुपर किंग्स सोडल्यानंतर संघाच्या प्रशिक्षण व्यवस्थेत बदल झाले होते. त्यानंतर हसीही नव्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्याने आपल्या राष्ट्रीय संघाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्यासमोरील पहिले आव्हान इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका असेल. ही मालिका २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठीही तो ऑस्ट्रेलियन संघाला मदत करणार आहे.
नव्या जबाबदारीबाबत मायकल हसी यांनी उत्साह व्यक्त केला असून, ऑस्ट्रेलियन संघासोबत काम करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनीही हसीचे स्वागत करत त्याच्या अनुभवाचा संघाला निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. पुढील वर्षी २ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्याआधी जून, जुलै आणि ऑगस्टदरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ॲशेस मालिका खेळवली जाणार आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येणार असून, दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. त्यामुळे आगामी काळात मायकल हसी आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षण चमूसमोर अनेक महत्त्वाच्या स्पर्धांसाठी संघाची तयारी करण्याचे आव्हान असेल.