गलथान कारभारामुळे महत्त्वाच्या बसेस बंद

आर्वी आगाराचा अजब कारभार

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
आर्वी
st bus आर्वी आगाराच्या गलथान आणि नियोजनशून्य कारभारामुळे आर्वीसह ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. आर्वी आगारातून सुटणाऱ्या नागपूर, यवतमाळ, शेगाव, चंद्रपूर, माहूर या महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या बसेस गेल्या अनेक दिवसांंपासून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता या बसेस बंद केल्याने दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
 

st bus
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांनी जास्त पैसे मोजून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. तसेच आर्वीवरून नागपूर, भंडारा, गोंदिया, रामटेक या थेट बससेवा उपलब्ध नसल्याने आर्वीच्या प्रवाशांना तळेगाव (श्या. पं.) येथून अमरावती, नागपूर डेपोच्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने उभ्याने प्रवास करावा लागत आहे. तसेच यवतमाळ, माहूर, शेगावला दर्शनासाठी आणि चंद्रपूरला कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात प्रवाशांनी आर्वी आगारात वारंवार चौकशी केली असता गाडी बिघडली आहे, चालक नाही, वरून आदेश आहे, गाड्या उपलब्ध नाहीत, गाड्या नादुरुस्त अशा मोघम आणि संदिग्ध स्वरूपाची उत्तरे देऊन प्रवाशांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे एसटी प्रशासन प्रवाशांच्या प्रश्नाबाबत किती गंभीर आहे, असा सवाल प्रवाशांनी तभाच्या प्रतिनिधीसमोर उपस्थित केला आहे.