तरनतारन.
Incidents of stubble burning in Tarn Taran पंजाबमध्ये शेतातील पिकांचे अवशेष अर्थात परळी जाळण्याच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. ५ नोव्हेंबर रोजी राज्यात परळी जाळण्याच्या ४४० नव्या घटनांची नोंद झाली. त्यामुळे १५ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या धान कापणी हंगामातील अशा घटनांची एकूण संख्या २,७८७ वर पोहोचली आहे. या प्रकारांमुळे राज्यातील वायुप्रदूषणाची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्हानिहाय आकडेवारी पाहता तरनतारनमध्ये सर्वाधिक ५८६, फिरोजपूरमध्ये ३६१, तर अमृतसरमध्ये २२१ घटनांची नोंद झाली आहे. हे तीन जिल्हे परळी जाळण्याच्या घटनांचे प्रमुख केंद्र ठरले आहेत.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आतापर्यंत ४६ लाख १० हजार रुपयांचा पर्यावरणीय दंड आकारण्यात आला असून, त्यापैकी २४ लाख ८५ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. याशिवाय भारतीय न्याय संहितेअंतर्गत संबंधितांविरोधात ७१० एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच ८२९ शेतजमिनींच्या सरकारी महसूल नोंदींमध्ये 'रेड एंट्री' करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ४ नोव्हेंबर रोजी राज्यात परळी जाळण्याची १५१ प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नव्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली.
धान कापणीनंतर गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांना अवघे १० ते २५ दिवस मिळतात. त्यामुळे पुढील पिकाची पेरणी वेळेत करता यावी, यासाठी शेत लवकर मोकळे करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. परळी काढण्यासाठी लागणाऱ्या मल्चिंग आणि अवशेषांच्या गाठी तयार करणाऱ्या यंत्रांची उपलब्धता कमी असणे किंवा त्यांची किंमत जास्त असणे, हीदेखील या समस्येची कारणे आहेत. यांत्रिक पद्धतीने कापणीनंतर शेतात मोठ्या प्रमाणात पिकांचे अवशेष शिल्लक राहतात. ते हाताने हटवणे कठीण असल्याने अनेक शेतकरी पराली जाळण्याचा पर्याय निवडतात. गव्हाच्या पेरणीत विलंब झाल्यास पुढील पिकाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीतीही असते. दुसरीकडे, परळी न जाळता तिचे व्यवस्थापन करता यावे आणि शेतकऱ्यांना त्यातून आर्थिक फायदाही मिळावा, यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत.