या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची रेंज १११.८ डेसिबल!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
loudest-firecracker-noise-testदिवाळीच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या १९ प्रकारच्या फटाक्यांची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’ या फटाक्याचा आवाज सर्वाधिक १११.८ डेसिबल नोंदविण्यात आला, तर ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी ७४.४ डेसिबल आढळला. वागळे इस्टेट येथील एका कंपनीच्या मोकळ्या जागेत गुरुवारी ही चाचणी घेण्यात आली.
 
firecracker
 
 
उच्च न्यायालयाने ध्वनी आणि वायुप्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या फटाक्यांवर निर्बंध घातले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासही मनाई केली आहे. या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बाजारातून विविध प्रकारचे फटाके खरेदी करून त्यांच्या आवाजाची तीव्रता मोजली. गेल्या वर्षी २५ प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली होती. यंदा १९ प्रकारच्या फटाक्यांची तपासणी करण्यात आली.
 
या चाचणीत ‘ऑल आउट ५०००’चा आवाज १११.८ डेसिबल नोंदविण्यात आला. त्याखालोखाल ‘टू गोल्ड’ या फटाक्याचा आवाज १०७.३ डेसिबल, ‘आर.के.’चा ९९.९, ‘मॅक्स’चा ९४.३, ‘सुदाम’चा ९१.४ आणि ‘कमांडो’चा ९०.६ डेसिबल आढळला. ‘वेलकानो’चा आवाज ८७.७, ‘टर्की’ आणि ‘गॉडझिला’चा प्रत्येकी ८५.४, तर ‘नाचीर’चा ८५.१ डेसिबल नोंदविण्यात आला.
 
याशिवाय ‘लेझर कलर’चा आवाज ८३.७, ‘गॉड ऑफ थंडर’चा ७९ आणि ‘कलर बटरफ्लाय’चा ७६.३ डेसिबल होता. ‘कुरवी चिमणी’चा आवाज ७४.४ डेसिबल नोंदविण्यात आला. तर ‘रेल्वे सिग्नल लाईट’चा आवाज ६७.६ डेसिबल असल्याचे चाचणीदरम्यान आढळले.