नागपूर,
mayo-hospital-doctor-assaultमेयो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचाराला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून निवासी डॉक्टर आणि रुग्णाच्या नातेवाइकांमध्ये वाद होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेत पोलीस कर्मचारी रणजित जाधव आणि त्यांचा मुलगा वेदांत यांनी निवासी डॉक्टरांना बेडवर पाडून मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. दरम्यान, डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी अशा दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने तहसील पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदविले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रणजित जाधव हे आपला २० वर्षीय मुलगा वेदांत याला घेऊन मेयो रुग्णालयात आले होते. वाहन साफ करताना वेदांतची बोट गाडीच्या चेनमध्ये अडकून गंभीर जखमी झाली होती. मानकापूर येथील खासगी रुग्णालयातून त्याला मेयोमध्ये पाठविण्यात आले होते. येथे जनरल सर्जरी विभागातील प्रथम वर्षाच्या निवासी डॉक्टरांनी तपासणी करून जखमी बोटाचा एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला.
याचवेळी आपत्कालीन विभागात अन्य एक गंभीर रुग्ण दाखल झाल्याने डॉक्टर त्याच्या उपचारासाठी गेले. यावरून जाधव पिता-पुत्रांनी नाराजी व्यक्त करीत आधी आपल्या मुलावर उपचार करण्याची मागणी केली. गंभीर रुग्णाला प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला.
डॉक्टरांच्या तक्रारीनुसार, जाधव पिता-पुत्रांनी त्यांना पकडून बेडवर पाडले, नखांनी ओरबाडले तसेच छातीवर मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे, रणजित जाधव यांनीही डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
या घटनेनंतर निवासी डॉक्टरांच्या MARD संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. डॉक्टरांविरुद्ध दाखल गुन्हे मागे घेणे, मारहाणीतील आरोपींना अटक करणे आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मेयोतील निवासी डॉक्टरांनी बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहेत.