महावितरणचा लेखा व्यवस्थापक एसीबीच्या जाळ्यात !

देयक मंजुरीसाठी ५० हजारांची लाच

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
वाशीम,
msedcl accounts महावितरणच्या मंडळ कार्यालयात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला असून, ठेकेदाराचे कामाचे देयक मंजूर करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणार्‍या लेखा व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी ५ नोव्हेंबर रोजी रंगेहात पकडले. बबलू चौलीवार (वय ४२, मूळ रा. गोंदिया, सध्या रा. वाशीम) असे कारवाई करण्यात आलेल्या अधिकार्‍याचे नाव आहे. या कारवाईने महावितरणच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
msedcl accounts
 
 
प्राप्त माहितीनुसार, बबलू चौलीवार हे मागील तीन वर्षांपासून वाशीम येथील महावितरण मंडळ कार्यालयात लेखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. महावितरणअंतर्गत केलेल्या कामाचे प्रलंबित देयक मंजूर करून देण्यासाठी त्यांनी एका नोंदणीकृत ठेकेदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. मात्र, शासकीय कामासाठी लाचेची रक्कम देण्यास इच्छुक नसलेल्या संबंधित ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वाशीम कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने प्रथम लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने चौलीवार यांना रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिलस उपअधीक्षक जगदीश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली वाशीम युनिटच्या पथकाने केली. या प्रकरणी संबंधित अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.msedcl accounts देयक मंजुरीसाठी लाचेची मागणी झाल्याचा हा प्रकार समोर आल्याने शासकीय कार्यालयातील पारदर्शक कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.