दिवाळीत अग्निशमन विभाग राहणार अलर्ट; नागपूर मनपाचे विशेष नियोजन

गांधीबाग, सुकता भवन आणि फटाका मार्केट परिसरात अग्निशमन वाहने तैनात

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |

नागपूर,
nagpur-diwali-fire-safety-2026दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री आणि आतषबाजी लक्षात घेता संभाव्य आगीच्या घटना व आपत्कालीन दुर्घटना टाळण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाने विशेष नियोजन केले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
 

fire 
 
दिवाळीच्या काळात अग्निशमन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता राहावी, यासाठी ८ आणि १४ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राजपत्रित, किरकोळ आणि अर्जित रजा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गांधीबाग, सुकता भवन आणि फटाका मार्केट परिसरात संभाव्य आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन वाहने आणि आवश्यक साहित्य तैनात ठेवण्यात येणार आहे.
 
आपत्कालीन परिस्थितीत तातडीने सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पाचपावली अग्निशमन केंद्रही कार्यान्वित ठेवण्यात येणार आहे. यासाठी यांत्रिकी (कारखाना) विभागाकडून आवश्यक वाहनचालक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ८ आणि १४ नोव्हेंबर रोजी अग्निशमन केंद्रांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन पाळ्यांमध्ये विशेष कर्तव्य आदेश जारी करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेतही पुरेसा कर्मचारीवर्ग तैनात राहणार आहे.
 
शहरातील सर्व अग्निशमन केंद्रांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून, कळमना येथील प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनाही अग्निशमन सहाय्यक म्हणून सेवेत पाचारण करण्यात आले आहे. या कालावधीत सर्व अग्निशमन वाहने, उपकरणे आणि साहित्य सज्ज ठेवण्यात येणार आहे.
 
दरम्यान, नागरिकांनी दिवाळी साजरी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे. फटाके मोकळ्या व सुरक्षित जागेतच फोडावेत. लहान मुलांनी मोठ्यांच्या देखरेखीखाली फटाके फोडावेत. ज्वलनशील पदार्थ, इमारती, वाहनतळ आणि गर्दीच्या ठिकाणी आतषबाजी करणे टाळावे. फटाका विक्रेत्यांनीही अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.