अनिल कांबळे
नागपूर,
prisoner assaulted in jail मध्यवर्ती कारागृहात एक कैदी झोपेत घोरत होता. त्याला अनेकदा समजून सांगितल्यानंतरही तो घोरत असल्यामुळे अन्य कैद्यांनी त्याची चांगली धुलाई केली. या मारहाती घोरणारा कैदी जखमी झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कारागृहासारख्या कडक सुरक्षा व्यवस्थेच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे कैद्यांमधील वादाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही घटना ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३५ वाजताच्या सुमारास कारागृहातील बडी गोल विभागाच्या बराक क्रमांक ४ मध्ये घडली. सतीश राजन पैसाडेली (वय २९, रा. विनायकनगर, न्यू म्हाळगी नगर) आणि मनीष चैत्राम ठाकूर (वय ४३) हे एकाच बराकीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश झोपेत घोरत असल्याने मनीष यांनी त्याला विरोध केला आणि आवाज बंद करण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. वाद वाढताच सतीशने संतापाच्या भरात मनीषच्या उजव्या डोळ्यावर ठोसा मारल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मनीष जखमी झाला.prisoner assaulted in jail घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाल्यानंतर कारागृह शिपाई सुनील भगवानदास फुल्लुके (वय ५०) यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी सतीश पैसाडेली याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) तसेच कारागृह अधिनियम, १८९४ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविला आहे. कारागृहाच्या बंदिस्त वातावरणात घोरण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून झालेली ही मारहाण चर्चेचा विषय ठरली आहे. या घटनेचा पुढील तपास धंतोली पोलिस करीत आहेत.