‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून ४५.२० लाखांनी फसवणूक

तोतया पोलिस अधिकाऱ्याने दिली अटकेची धमकी; चार दिवसांत आयुष्यभराची बचत लुटली

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर,
digital arrest threats आयुष्यभर कष्ट करून जमवलेली बचत सुरक्षित राहावी, या विश्वासाने बँकेत ठेवलेली रक्कमही सायबर भामट्यांनी क्षणात लुटली. पोलिस अधिकारी असल्याचे भासवून अटकेची भीती दाखवत सायबर गुन्हेगारांनी मानेवाडा नव्हे, तर मानकापूर येथील एका ७० वर्षीय निवृत्त वेकोलि कर्मचाऱ्याला तब्बल ४५ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातला. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान घडलेल्या या प्रकारात बनावट गुन्ह्यांचा धाक दाखवून वृद्धाला स्वतःचीच बचत भामट्यांच्या खात्यात जमा करण्यास भाग पाडण्यात आले.
 

digital arrest threats 
 
 
गोपाल मांडलिक सोनेकर असे फसवणूक झालेल्या निवृत्त कर्मचाऱ्याचे नाव आहे. सायबर पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, आरोपींनी सुरुवातीला त्यांना फोन केला. त्यांच्या आधार कार्डचा वापर करून सिमकार्ड खरेदी करण्यात आले असून, त्या क्रमांकावरून नागरिकांना धमक्या दिल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर सोनेकर यांच्या बँक खात्यात संशयास्पद आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगून त्यांना आणखी घाबरविण्यात आले. भामट्यांनी विश्वास संपादन करण्यासाठी व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉलचा आधार घेतला. या कॉलवर त्यांनी पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाचे कारण पुढे करून अटकेची धमकी दिली. सहकार्य न केल्यास गंभीर कायदेशीर कारवाई होईल, असे सांगून वृद्धावर मानसिक दबाव निर्माण केला.
भीतीपोटी स्वतःच रक्कम केली हस्तांतरित
अटकेच्या भीतीने घाबरलेल्या सोनेकर यांना बँकेतील रक्कम पडताळणी आणि सुरक्षिततेसाठी एका विशिष्ट खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. पोलिसांच्या नावाने आलेल्या धमक्यांवर विश्वास ठेवल्याने त्यांनी भामट्यांनी सांगितलेल्या खात्यात एकूण ४५.२० लाख रुपये हस्तांतरित केले.digital arrest threats मात्र, नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. ४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३८ वाजता अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, तोतयागिरी आणि बनावटगिरीसंबंधी तरतुदींसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६-ड अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
 
लक्षात ठेवा!
- पोलिस, सीबीआय किंवा अन्य तपास यंत्रणा व्हिडीओ कॉलवरून ‘डिजिटल अरेस्ट’ करीत नाहीत.
- बँक खात्यातील रक्कम पडताळणीच्या नावाखाली अनोळखी खात्यात जमा करण्यास सांगितल्यास सावध व्हा.
- अटकेची धमकी देऊन पैसे मागणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका.
- सायबर फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा
- cybercrime.gov.in येथे तक्रार नोंदवा.