कराची,
Secret training by Lashkar-e-Taiba near Karachi पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा समुद्रमार्गे हल्ले करण्याची क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे. कराचीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चारना बेटावर पर्यटनाच्या आड दहशतवाद्यांना समुद्री प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या या बेटावर पर्यटकांच्या वेशात येणाऱ्या लष्करच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणा या गटाच्या हालचालींवर लक्ष ठेवून असून, त्याला लष्करची दावा मरीन विंग किंवा सदा-ए-हुर्रियत या नावाने ओळखले जात असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील मंगला धरण परिसरात तसेच दहशतवादी तळांवरील जलतरण तलावांमध्येही अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती समोर आली होती. यातील काही ठिकाणे भारताने अलीकडील लष्करी कारवाईत उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला आहे.

या प्रशिक्षणामागे लष्करशी संबंधित पाकिस्तानी मरकजी मुस्लिम लीग (PMML) या संघटनेच्या सदस्यांचा सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. लष्कर-ए-तोयबाने २००८ पासूनच स्वतंत्र समुद्री गट तयार केला असून, आता त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर समुद्रमार्गे हल्ले करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांनीही समुद्रमार्गाचा वापर केला होता. त्यामुळे पाकिस्तानमधील या नव्या हालचालींकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा गांभीर्याने पाहत आहेत. मे २०२५ मध्ये राबविण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानमधील नऊ प्रमुख दहशतवादी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले होते. यामध्ये मुरीदके येथील लष्करच्या मुख्यालयासह नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी लॉन्चपॅडचाही समावेश होता.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये काउंटर इंटेलिजन्स कश्मीर (CIK) या यंत्रणेने दहशतवादी भरती आणि कट्टरतावादाच्या संशयावरून सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना लष्करमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मॉड्यूलचा तपास सुरू आहे. बडगाम, श्रीनगर, बिजबेहरा, अनंतनागमधील मटन आणि पुलवामा जिल्ह्यातील एका गावात ही शोधमोहीम राबवण्यात आली. या कारवाईत डिजिटल उपकरणे, कागदपत्रे आणि इतर संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. तपासादरम्यान २२ वर्षीय मोहम्मद यासीन मीर याच्या घराचीही झडती घेण्यात आली. त्याची आई तबसुम शाहीन या पाकिस्तानी नागरिक असून, त्या गेल्या वर्षी २९ एप्रिल रोजी पाकिस्तानला गेल्यानंतर परतलेल्या नाहीत. त्यांना व्हिसा नाकारण्यात आला होता की त्यांनी स्वतःहून परत न येण्याचा निर्णय घेतला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या आपल्या मुलाच्या संपर्कात होत्या का, यासह या संबंधातील सर्व बाबींचा CIK कडून तपास केला जात आहे.