ओमान,
sehwags-son-aryavirs-explosive-innings भारताच्या युवा संघाने अंडर-१९ आशिया कप स्पर्धेत नेपाळविरुद्ध दणदणीत विजयाची नोंद केली. भारतीय संघाने हा सामना १० गडी राखून जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग. त्याने आक्रमक फलंदाजी करत अवघ्या ५२ चेंडूंमध्ये नाबाद ७० धावा ठोकल्या. त्याला कर्णधार लक्ष्य रायचंदानीनेही उत्तम साथ दिली. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या नेपाळच्या संघाला भारतीय गोलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. नियमित अंतराने विकेट गमावल्यामुळे नेपाळचा डाव ४२.३ षटकांत १२८ धावांवर आटोपला. नेपाळकडून दर्श सुथारने सर्वाधिक ४३ धावांचे योगदान दिले. मात्र, इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.

भारताकडून ईशान सूदने सुरुवातीपासूनच नेपाळच्या फलंदाजांवर दबाव निर्माण केला. त्याने तीन फलंदाजांना माघारी धाडले. अर्जुन राजपूतनेही तीन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. यशवीर गौडने दोन, तर मनाल चौहान आणि काव्या पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. भारतीय गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीमुळे नेपाळचा डाव १२८ धावांवर संपुष्टात आला. विजयासाठी मिळालेले १२९ धावांचे लक्ष्य गाठताना भारतीय सलामीवीरांनी नेपाळच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. आर्यवीर सेहवागने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. त्याने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. एकूण ५२ चेंडूंचा सामना करताना त्याने सात चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या.
दुसऱ्या बाजूला कर्णधार लक्ष्य रायचंदानीने संयमी फलंदाजी करत विजयाची जबाबदारी सांभाळली. त्याने ६३ चेंडूंमध्ये सात चौकारांसह नाबाद ५३ धावा केल्या. दोघांनीही अखेरपर्यंत विकेट न गमावता भारताला १९.१ षटकांतच विजय मिळवून दिला. आर्यवीरच्या आक्रमक फलंदाजीमुळे त्याची तुलना वडील वीरेंद्र सेहवाग यांच्या खेळण्याच्या शैलीशी केली जात आहे. युवा फलंदाजाच्या या कामगिरीने अंडर-१९ आशिया कपमध्ये भारतीय संघाने आपली ताकद दाखवून दिली.