मुंबई,
shah-rukhs-funny-comment बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आगामी ‘किंग’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘तू मिल जाये’ हे पहिले गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, शाहरुखची मुलगी सुहाना खान हिने या गाण्यावर एक खास व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधलेच, शिवाय स्वतः शाहरुख खानलाही आश्चर्यचकित केले आहे.
सुहाना खानने दिवाळी पार्टीसाठी तयार होत असतानाचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला मेकअप करताना दिसते. त्यानंतर काही क्षणांतच तिचा संपूर्ण लूक बदलतो आणि ती आकर्षक अंदाजात दिसते. याचदरम्यान ती ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाये’ या गाण्यावर लिप-सिंक करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, गाण्यातील एड शीरनच्या भागाचीही तिने अचूक नक्कल केली आहे.
सुहानाच्या या व्हिडिओवर अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते तिचे वडील शाहरुख खान यांच्या कमेंटने. सुहानाचा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त करत शाहरुखने विचारले की, तुला या गाण्याचे बोल कसे आठवतात? एड शीरन खूप वेगाने गात असल्यामुळे आपल्यालाच हे गाणे लक्षात ठेवणे कठीण गेले, अशी मिश्किल टिप्पणीही त्याने केली.
सुहानाने या व्हिडिओला ‘आणखी एकदा’ असे कॅप्शन दिले होते. तिची मैत्रीण आणि अभिनेत्री अनन्या पांडे हिनेही व्हिडिओचे कौतुक केले. आयुष्यात यापेक्षा सुंदर काही पाहिले नसल्याची प्रतिक्रिया तिने दिली. याशिवाय नव्या नंदा, आरी आणि लॅरिसा बोनेसी यांनीही सुहानाच्या पोस्टवर कमेंट करत तिचे कौतुक केले.
शाहरुख-दीपिकाची जोडी पुन्हा पडद्यावर
दरम्यान, ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाये’ हे पहिले गाणे शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्त २ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित करण्यात आले होते. या रोमँटिक गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची जोडी पाहायला मिळत आहे. अरिजित सिंग, एड शीरन आणि मधुबंती बागची यांनी हे गाणे गायले असून, सचिन-जिगर यांनी त्याला संगीत दिले आहे. गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. यामध्ये एड शीरनने लिहिलेल्या इंग्रजी रॅपचाही समावेश आहे.
शाहरुख आणि दीपिका यांची जोडी यापूर्वी ‘ओम शांती ओम’, ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमध्ये झळकली आहे. आता ‘किंग’च्या निमित्ताने ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असल्याने चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. अॅक्शन थ्रिलर असलेला हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.