मुंबई,
shahzad-poonawalla ‘राईज अँड फॉल २’ या रिॲलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता अखेर निश्चित झाला असून, शहजाद पूनावाला याने बाजी मारत विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत त्याने शोची ट्रॉफी जिंकली. या विजयासह त्याला ३५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही मिळाले आहे. संपूर्ण पर्वात शहजादने आपल्या खेळाची पद्धत, स्पष्टवक्तेपणा आणि योग्य रणनीतीच्या जोरावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. अनेक चढ-उतारांचा सामना करत त्याने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि अखेरीस विजेतेपद पटकावले.
या शोच्या अंतिम फेरीत शहजाद पूनावाला, गौतम गुलाटी आणि प्रियांका चहर चौधरी यांनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले होते. मात्र, अंतिम निकालात शहजादने दोघांनाही मागे टाकले. प्रियांका चहर चौधरीला प्रथम उपविजेतेपद, तर गौतम गुलाटीला दुसरे उपविजेतेपद मिळाले. याशिवाय स्वरा भास्कर, करण पटेल आणि निहारिका यांनीही अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता.
अंतिम फेरीतील स्पर्धा अधिक रंगतदार ठरली. टॉप ६ मधून सर्वप्रथम निहारिका, त्यानंतर करण पटेल आणि स्वरा भास्कर यांचा प्रवास संपुष्टात आला. त्यानंतर उरलेल्या तीन स्पर्धकांमध्ये विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळाली. अंतिमतः मतदानाच्या माध्यमातून विजेत्याची निवड करण्यात आली. पहिल्या तीन स्पर्धकांमध्ये बरोबरी झाल्यानंतर इतर स्पर्धकांना मतदानासाठी बोलावण्यात आले. या मतदानानंतर शहजादला विजेता घोषित करण्यात आले.
विजय मिळाल्यानंतर शहजादने आपला आनंद व्यक्त करत शोमधील संघर्षमय प्रवासाला उजाळा दिला. त्याने सांगितले की, या संपूर्ण प्रवासात अनेक अनपेक्षित प्रसंग आणि कठीण आव्हानांचा सामना करावा लागला. कधी परिस्थिती अनुकूल होती, तर कधी स्वतःच्या निर्णयांबाबत शंका निर्माण झाली. मात्र, आपण हे यश मिळवू शकतो, हा विश्वास त्याने कधीही सोडला नाही. अखेर हातात विजेतेपदाची ट्रॉफी आल्यानंतर त्याचा हा विश्वास सार्थ ठरल्याची भावना त्याने व्यक्त केली.
शहजादच्या मते, या यशामागे त्याची जिद्द, आत्मविश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता महत्त्वाची ठरली. या शोमधून तो केवळ ट्रॉफी घेऊन जात नसून, अनेक चांगल्या आठवणी, मैत्री आणि नातीही सोबत घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. शोदरम्यान घेतलेल्या निर्णयांचा आणि आपल्या वागणुकीचाही त्याला अभिमान असल्याचे त्याने नमूद केले. या संपूर्ण प्रवासात साथ देणाऱ्या शोच्या निर्मात्यांसह एमएक्स प्लेयर बाय प्राइम व्हिडिओ आणि बनिजे एशिया या संस्थांचेही शहजादने आभार मानले. आपली प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याने संपूर्ण टीमचे कौतुक केले.