स्कूटीचा अपघात पाहण्यासाठी जमले, पण पुढच्याच क्षणी मृत्यूने गाठलं; 7 जणांचा मृत्यू

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
खुंटी,
speeding-truck-ran-over-a-crowd दिवाळीच्या सणादरम्यान झारखंडमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका स्कूटीस्वाराचा अपघात झाल्यानंतर त्याच्या मदतीसाठी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांना भरधाव ट्रकने चिरडल्याची भीषण दुर्घटना घडली. या अपघातात चार महिला आणि तीन मुलांसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नेमकी घटना काय घडली?
 
speeding-truck-ran-over-a-crowd
 
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील कर्रा-तोरपा मुख्य रस्त्यावर गुरुवारी (६ नोव्हेंबरच्या आधीच्या रात्री) हा भीषण अपघात घडला. जोने-लुद्रू वळणाजवळ रात्री साधारण ९.४५ वाजण्याच्या सुमारास एका स्कूटीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर स्कूटी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झुडपांमध्ये जाऊन पडली. अपघाताचा आवाज ऐकून जवळच्या वस्तीतील नागरिक घटनास्थळी जमा झाले. स्कूटीस्वाराला बाहेर काढण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी काही लोक पुढे सरसावले. दरम्यान, परिसरातील महिला आणि लहान मुलेही घटनास्थळी पोहोचली. मात्र, काही क्षणांतच तिथे आणखी एक मोठी दुर्घटना घडली.
 
भरधाव ट्रकने जमावाला चिरडले
स्कूटीस्वाराला मदत करण्यासाठी नागरिक रस्त्याच्या कडेला जमले असतानाच तोरपा बाजूने एक भरधाव १८ चाकी ट्रक आला. रस्त्यावरील तीव्र वळण घेत असताना ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने त्याने तिथे उभ्या असलेल्या नागरिकांना जोरदार धडक दिली. अंधारामुळे चालकाला रस्त्याच्या कडेला उभे असलेले लोक दिसले नसावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
 
ट्रकची धडक इतकी भीषण होती की अनेकांना स्वतःचा जीव वाचवण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात सात जणांचा जीव गेला असून एक मुलगी जखमी झाली आहे.
 
महिला आणि चिमुकल्यांचाही मृतांमध्ये समावेश
या दुर्घटनेतील मृतांमध्ये चार महिला आणि तीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये पको देवी, कसिला देवी, मनहू देवी, गोलू कुमार, अंजली कुमारी, तुती कुमारी आणि सौरभ नायक यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. सौरभ हा अवघ्या १२ वर्षांचा होता. या अपघातात खुशबू कुमारी ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने खुंटी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. एकाच दुर्घटनेत अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.