रांची,
Suicide of tribal leader Nisha Bhagat झारखंडची राजधानी रांची येथील पिठोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत आदिवासी नेत्या निशा भगत यांच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेपूर्वी त्यांनी फेसबुकवर सुमारे १० मिनिटांचे लाइव्ह केले होते. या व्हिडिओत त्यांनी अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप करत आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.

शुक्रवारी फेसबुक लाइव्हदरम्यान निशा भगत यांनी आपल्या अडचणी मांडल्या. आदिवासी समाजाच्या संरक्षणासाठी आपण सातत्याने संघर्ष केला; मात्र अपेक्षित परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. आपली बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाई झाली नाही आणि त्यांच्या तक्रारींकडेही दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. वडिलांचा उल्लेख करताना, या घटनेमुळे त्यांना मोठा धक्का बसेल, असेही त्या म्हणाल्या. अनेक अधिकारी तसेच पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधूनही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी लाइव्हमध्ये नमूद केले. याचदरम्यान त्यांनी पिठोरिया पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना फोन करून आपले जीवन संपवण्याचा विचार असल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी फोन कट केल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निशा भगत यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रिम्स रुग्णालयात पाठवण्यात आला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून, फेसबुक लाइव्हमध्ये करण्यात आलेले आरोप आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचीही चौकशी केली जात आहे.