वर्धा
marke-dhanteras धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जात आहे. काही महिन्यांपूर्वी सोन्या-चांदीच्या दरांनी उच्चांक गाठला होता. दिवाळीच्या तोंडावर सोने आणि चांदीचे दर उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. सर्वत्र दुष्काळाची चर्चा असली तरी खरेदीचा उत्साह मात्र कुठेहे कमी नव्हता. धनत्रयोदशीच्या पृष्ठभूमीवर वर्धेच्या सराफा बाजारपेठेत सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पाहायला मिळत असून सराफा बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. दरवाढीची चिंता बाजूला ठेवत अनेक ग्राहकांनी दागिने, सोन्याची नाणी, चांदीची भांडी तसेच विविध वस्तूंच्या खरेदीला पसंती दिली आहे. आज सकाळपासुनच एमटीडी ज्वेलर्समध्ये ग्राहकांची चांगलीच गर्दी होती.
धनत्रयोदशीच्या निमित्ताने सराफा व्यावसायिकांनीही ग्राहकांसाठी ऑफर ठेवल्या आहेत. दिवाळीनंतर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असल्याने अनेक कुटुंबांनी धनत्रयोदशीपासूनच दागिन्यांच्या खरेदीला सुरुवात केली आहे.
धनत्रयोदशीला धनाची देवता कुबेर यांच्यासह भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सोन्या-चांदीबरोबरच या दिवशी झाडू आणि फडा खरेदी करण्याचीही परंपरा आहे. झाडूची खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे बाजारपेठेत या वस्तूंचीही खरेदी होत आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने स्टील मार्केटमध्येही खरेदीचा उत्साह दिसून आला. तांबे, पितळ आणि स्टीलच्या भांड्यांसह विविध गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होती.
छप्पर फाडके : ढोमणे
गेल्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या भावात घसरन झाली. त्यामुळे ग्राहकांनी त्याचा फायदा घेत आज सोने आणि चांदीची खरेदी केली. त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी छप्पर फाडकेच होता, अशी प्रतिक्रिया एमटीडीचे संचालक ढोमणे बंधू यांनी दिली. नवीन बुकींगही झाले. यावेळी युवा ग्राहकही मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी आल्याचे सौरभ ढोमणे म्हणाले.