पराभवानंतरही ट्रम्प यांचा आक्रमक पवित्रा; डेमोक्रॅट्सना थेट आव्हान!

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's aggressive stance despite defeat अमेरिकेच्या २०२६ मधील मिडटर्म निवडणुकीत डेमोक्रॅट्सनी मोठा विजय मिळवल्यानंतरही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासन माघार घेण्याच्या मनःस्थितीत नाही. विरोधकांशी सामंजस्याची भूमिका घेण्याऐवजी ट्रम्प यांच्या राजकीय वारशाचे आक्रमकपणे समर्थन करण्याचा पवित्रा व्हाइट हाऊसने घेतला आहे. यासाठी व्हाइट हाऊसकडून १३ कलमी घोषणापत्र जारी करण्यात आले असून, त्यामध्ये राजकीय विरोधक, माध्यमांमधील टीकाकार आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर निशाणा साधण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या राजकीय कारकिर्दीच्या समाप्तीविषयी व्यक्त करण्यात आलेले अंदाज यापूर्वीही चुकीचे ठरले असून, यावेळीदेखील ते खरे ठरणार नाहीत, असा दावा व्हाइट हाऊसने केला आहे.
 
 
 
et567
 
कॅपिटल हिलमध्ये सत्तेतील बदलाची तयारी सुरू असताना ट्रम्प प्रशासनाने आगामी दोन वर्षांसाठी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली आहे. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील शेवटच्या दोन वर्षांत घेतलेले निर्णय आणि धोरणे बदलण्याचा डेमोक्रॅट्स प्रयत्न करतील; मात्र त्यांना यश मिळणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. डेमोक्रॅट्स सुरक्षित केलेल्या सीमा पुन्हा खुल्या करतील, आर्थिक विकासानंतर कर वाढवतील, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना कमकुवत करतील आणि देशातून मोठ्या संख्येने बेकायदेशीर स्थलांतरितांना बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रवेशाला प्रोत्साहन देतील, असा आरोपही घोषणापत्रात करण्यात आला आहे.
 
 
याशिवाय ग्रीन न्यू डील पुन्हा लागू करणे, अल्पवयीन मुलांसाठी ट्रान्सजेंडर शस्त्रक्रिया पुन्हा सुरू करणे, समानता आणि समावेशाशी संबंधित (DEI) कार्यक्रमांना चालना देणे, सेन्सॉरशिपची व्यवस्था पुन्हा आणणे आणि बेकायदेशीर स्थलांतरितांना संरक्षण देणे, असे प्रयत्न डेमोक्रॅट्स करतील, असा दावा व्हाइट हाऊसने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या पसंतीच्या व्यक्तींची नियुक्ती करण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मिडटर्म निवडणुकीतील निकाल हा व्हाइट हाऊसविरोधातील जनादेश नसून केवळ तात्पुरता राजकीय अडथळा असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. अमेरिकन जनतेने विरोधकांचा अजेंडा यापूर्वीच नाकारला असल्याचा दावा करत प्रशासनाने आगामी दोन वर्षांत संघर्षासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लढा देणे कधीही थांबवणार नाहीत, असा ठाम संदेशही व्हाइट हाऊसने दिला आहे.