वैभव चव्हाणच्या मृत्यूचे गूढ वाढले; घातपाताचा नातेवाइकांचा आरोप

    दिनांक :06-Nov-2026
Total Views |
बीड,
Vaibhav Chavan's death बीड जिल्ह्यात पोलीस भरतीतील बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचे प्रकरण समोर आणणाऱ्या २४ वर्षीय वैभव चव्हाण या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नवगण राजुरी येथील रहिवासी असलेल्या वैभवचा मृतदेह गुरुवारी इमामपूर शिवारात आढळून आला. त्याच्या शरीरावर आणि पायांवर मारहाणीच्या खुणा असल्याचा दावा त्याचा भाऊ गणेश चव्हाण आणि नातेवाइकांनी केला आहे. वैभवचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्यामागे घातपात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे बीड जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
g6576867
 
वैभव हा कराटे खेळातील उत्कृष्ट खेळाडू होता. त्याच्याकडे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत क्रीडा प्रमाणपत्रे होती. २०२४-२५ मध्ये झालेल्या धाराशिव पोलीस भरतीसाठी त्याने खेळाडू कोट्यातून अर्ज केला होता. प्रतीक्षा यादीत असताना त्याच्या पुढील उमेदवाराने बनावट क्रीडा प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा संशय वैभवला आला. त्यानंतर त्याने पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा आयुक्तालयाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे 'कुराश असोसिएशन'च्या अध्यक्ष, सचिवांसह अनेक जिल्हाध्यक्षांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. पुण्यात पोलीस भरतीत निवड झालेल्या १९ जणांपैकी नऊ जणांना, जे त्यावेळी सेवेत होते, अटक होऊन तुरुंगात जावे लागले होते. या प्रकरणानंतर बोगस प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांकडून स्वतःच्या आणि मित्राच्या जीवाला धोका असल्याचे वैभवने एका ऑडिओ संदेशातून सांगितले होते. हा संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. वैभवच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हनुमंत धायगुडे आणि महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
 
 
दरम्यान, वैभवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक इनक्वेस्ट पंचनामा आणि तात्पुरत्या वैद्यकीय अहवालातून थेट मारहाण झाल्याचे निष्पन्न झालेले नाही. मात्र, मृत्यूच्या कारणाचा सखोल तपास करण्यासाठी दोन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभवच्या मोबाईलमधील डेटा डिलीट झाला असला तरी तो पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. गुरुवारी रात्री उशिरा नवगण राजुरी येथे पोलीस बंदोबस्तात वैभववर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पोलीस भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि बनावट क्रीडा प्रमाणपत्रांच्या रॅकेटबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.