बुलढाणा,
attack-by-a-rabid-dog मित्रांसोबत घराबाहेर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या १२ वर्षीय मुलाचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील जनुना गावात घडली आहे. सक्षम गव्हांदे असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सक्षम घराबाहेर मित्रांसोबत खेळत असताना अचानक एका पिसाळलेल्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सक्षममध्ये रेबीजची लक्षणे आढळून आली. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी तातडीने अकोला येथील रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. अवघ्या १२ वर्षांच्या मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गव्हांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने जनुना गावात शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.