दिवाळीच्या तोंडावर रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यातून ३२.८२ लाख गायब

- निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याला स्वतःच्या चुकीचा फटका

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर
railway officials account रेल्वे विभागात सेवानिवृत्त अधिकाऱ्याला हेल्थ कार्ड अपडेट करुन देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी एपीके फाईल मोबाईलमध्ये डाऊनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर मोबाईलचा ताबा मिळवत ३२.८२ लाख रुपये परस्पर दुसऱ्या खात्यात वळते करुन फसवणूक केली.
 

railway officials account 
 
फिर्यादी रविंद्रसिंग बन्सीलाल सिंग बनाफर (६०) हे हाऊसिंग क्रमांक ९४५, तेलंगखेडी रामनगर, अमरावती रोड परिसरातील रहिवासी आहेत. ते रेल्वे विभागातून सहाय्यक कार्यकारी अधिकारी पदावरुन ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सेवेतून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या २ नोव्हेंबरला त्यांनी रेल्वे ‌विभागातील एपीओ अधिकारी असल्याची बतावणी करुन एकाने फोन केला. पेंशन व्यवस्थित मिळण्यासाठी हेल्थ कार्ड अपडेट करण्याचा आग्रह त्याने धरला.
त्यानंतर फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना वैद्यकीय कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. आरोपीने फिर्यादीकडून विविध कागदपत्रे मिळवली आणि त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्यास भाग पाडले.railway officials account या प्रक्रियेदरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलमध्ये एपीके फाईल डाऊनलोड केली. त्यानंतर मोबाईलचा ताबा मिळवून महाराष्ट्र बँकेतील खात्यातून ३२ लाख ८२ हजार १५० रुपये अन्य खात्यात वळवून घेतले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस करीत आहेत.