ट्रम्प यांच्या हत्येचा कट?

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
A Plot to Assassinate Trump? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घटना समोर आली आहे. व्हाइट हाऊसजवळ संशयास्पद हालचाली करताना आढळलेल्या एका व्यक्तीला अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्याच्या वाहनाची तपासणी केली असता तीन वेगवेगळी शस्त्रे आणि डझनभर काडतुसे आढळून आली. संबंधित व्यक्तीने आपल्या डोक्यात काही आवाज ऐकू येत असल्याचे आणि हे आवाज त्याला वॉशिंग्टनमध्ये जाऊन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्यास सांगत असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) दिली आहे.
 

ट्रम्प  
गृह सुरक्षा विभागाच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रॉनी यॉर्ड्रिक्स गुआनिपा चिरिनोस असे आहे. तो व्हेनेझुएलामधून आलेला स्थलांतरित असून अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्यास होता. मार्च २०२४ मध्ये टेक्सासमार्गे त्याने अमेरिकेत प्रवेश केला होता. अधिकाऱ्यांना सुरुवातीला त्याची गाडी संशयास्पद स्थितीत उभी असल्याचे दिसले. पुढील तपासात ही गाडी चोरीला गेल्याची नोंद असल्याचेही उघड झाले. वाहनाची झडती घेतल्यानंतर तीन शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी त्याच्यावर आरोप निश्चित करण्यात आले असून सध्या तो अमेरिकी मार्शल्स सर्व्हिसच्या ताब्यात आहे.
अमेरिकेचे गृह सुरक्षा सचिव मार्कवेन मुलिन यांनी या कारवाईत सहभागी सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांचे कौतुक केले. व्हाइट हाऊसजवळ संशयिताला वेळीच पकडल्यामुळे संभाव्य धोका टळल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घटनेवर व्हाइट हाऊसने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणासंदर्भातील प्रश्नांसाठी DHS आणि अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींविरोधात सुरक्षा यंत्रणांनी अनेक कारवाया केल्या आहेत.