राम मंदिराच्या दर्शनासाठी अखिलेश यादव सज्ज

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
लखनऊ,
Akhilesh Yadav visits the Ram Mandir समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याचा निर्णय घेतला असून, १२ डिसेंबर रोजी ते आपल्या संपूर्ण कुटुंबासह अयोध्येला जाणार आहेत. यावेळी रामलल्लाचे दर्शन घेण्याबरोबरच ते हनुमानगढी मंदिरातही दर्शनासाठी जाणार आहेत. समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी या दौऱ्याची अधिकृत तारीख जाहीर केली. काही दिवसांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर आलेल्या अखिलेश यादव यांनी पवन पांडे यांच्याकडे मंदिर दर्शनासाठी योग्य तारीख निश्चित करण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार शनिवारी, छोटी दिवाळीच्या दिवशी पवन पांडे यांनी १२ डिसेंबर ही तारीख निश्चित झाल्याचे सांगितले. विशेष म्हणजे, राम मंदिराच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशच्या राजकारणात यापूर्वीही मोठी चर्चा झाली आहे. आता विरोधी पक्षातील प्रमुख नेते अखिलेश यादव यांच्या प्रस्तावित दौऱ्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
 
 
324356567
 
 
अखिलेश यादव यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा होताच भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली. भाजपचे नेते राकेश त्रिपाठी यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अखिलेश यादव यांना राम मंदिरात जाण्यास खूप उशीर झाल्याचे म्हटले. रामभक्तांवर गोळीबार झाल्याच्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी अखिलेश यादव यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. तसेच, केवळ निवडणुका जवळ आल्यामुळे मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला जात असेल, तर त्याचा राजकीय फायदा होणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. रामलल्लाचे दर्शन खऱ्या भक्तिभावाने घेतले असते, तर प्रभू रामाची कृपा लाभली असती, असेही त्रिपाठी यांनी म्हटले. रामभक्त त्यांना त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेबद्दल सहज माफ करणार नाहीत, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
 
 
दरम्यान, सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनीही अखिलेश यादव यांच्या दौऱ्यावरून निशाणा साधला. अखिलेश यादव यांना आता निवडणुका जवळ आल्याची जाणीव झाली आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उशिरा का होईना, त्यांना सद्बुद्धी सुचल्याचे सांगत राजभर यांनी उपरोधिक टोला लगावला. अयोध्येनंतर मथुरा आणि काशी येथील दर्शनाच्या तारखाही जाहीर कराव्यात, असे आव्हान त्यांनी दिले. या प्रतिक्रियांमुळे अखिलेश यादव यांच्या राम मंदिर भेटीला धार्मिक कार्यक्रमासोबतच राजकीय महत्त्वही प्राप्त झाले आहे.