पुणे,
akkalkot-highway-accidentअक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबाच्या आनंदावर रस्त्यातच विरजन पडलं. अक्कलकोटला सोबत दर्शनासाठी निघालेलं हे कुटुंब क्षणात संपलं. पुणे-सोलापूर महामार्गावरच काळानं त्यांना गाठलं. दर्शन घेण्याआधीच कल्याण येथील भारंबे कुटुंबावर मोहोळ तालुक्यात काळाने घाला घातला. ज्यात चिमुकल्यासह घरातील ४ लोकांचा मृत्यू झाला.
कल्याण येथील भारंबे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघालं होतं. मात्र, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कंटेनरने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात विलास भारंबे (वय ६६), शोभा विलास भारंबे (वय ६३), पार्थ तुषार भारंबे (वय आठ) आणि पूनम तुषार भारंबे (वय ३८) यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा अपघातस्थळी जागीच मृत्यू झाला. तर, पूनम भारंबे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. तुषार विलास भारंबे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आनंदात प्रवासाला निघालेल्या या कुटुंबावर काळानं इतका भीषण घाला घातल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
मृतांचे पार्थिव मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तसंच अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी आणि सुरक्षित अंतर ठेवावे, असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.