मुंबई:
amitabh-bachchan बॉलिवूडचे शहेनशाह आणि लाडके महानायक अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक पाहिला जाणारा शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या सेटवरून एक मोठी घडामोड समोर आली असून, प्रकृती बिघडल्यामुळे अमिताभ बच्चन यांनी शूटिंगमधून अचानक ब्रेक घेतला आहे. त्यामुळे या लोकप्रिय शोच्या नवीन भागांचे चित्रीकरण सध्या पूर्णपणे ठप्प झाले आहे.
माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची प्रकृती बरी नसल्यामुळे निर्मात्यांनी गेल्या आठवड्यापासूनच ‘केबीसी’च्या नवीन भागांचे शूटिंग थांबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. महानायकांच्या प्रकृतीत जोपर्यंत पूर्णपणे सुधारणा होत नाही, तोपर्यंत सेटवर पुनरागमन न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
बदलावे लागले प्रसारणाचे वेळापत्रक
चित्रीकरण अचानक थांबवावे लागल्यामुळे चॅनेलला आपल्या प्रसारणाचे वेळापत्रक तातडीने बदलावं लागलं आहे. सध्यातरी चॅनेलने यापूर्वी शूट करून ठेवलेले काही विशेष आणि सेलिब्रिटी एपिसोड्स दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच आगामी ‘रामायण’ चित्रपटाच्या स्टार कास्टने, ज्यामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांचा समावेश होता, या शोमध्ये हजेरी लावली होती. हा विशेष भाग नंतर प्रसारित केला जाणार होता, परंतु वेळेवर शूटिंग बंद झाल्यामुळे आता दिवाळी विशेष भागात ‘रामायण’ टीमचे हे एपिसोड्स आधीच प्रसारित केले जात आहेत.