मुंबई,
Anil Mehta passes away मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल धोंडीलाल मेहता यांचे शनिवारी सकाळी कोल्हापूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. मूळचे कर्नाटकातील निपाणी येथील असलेल्या मेहता यांनी पुण्यातून बीकॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोल्हापुरात पुस्तक विक्री व्यवसायाला सुरुवात केली. उद्योगपती देवचंद शहा यांच्या सहकार्याने १९६५ मध्ये त्यांनी बंधू उल्हास मेहता यांच्यासोबत कोल्हापुरात ‘अजब पुस्तकालय’ सुरू केले. याच उपक्रमातून त्यांच्या प्रकाशन क्षेत्रातील प्रवासाला दिशा मिळाली. त्यांच्या निधनामुळे साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापुरातून सुरू झालेल्या या व्यवसायाचा विस्तार पुढे पुण्यापर्यंत झाला. १९७६ मध्ये त्यांनी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ची स्थापना केली. आनंद यादव यांच्या ‘माळावरची मैना’ या कथासंग्रहाच्या प्रकाशनाने संस्थेच्या वाटचालीला सुरुवात झाली. पुढे वि. स. खांडेकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, शिवाजी सावंत, व. पु. काळे आणि शांता शेळके यांसारख्या नामवंत लेखकांचे साहित्य या संस्थेने प्रकाशित केले. मराठी वाचकांना जागतिक साहित्याची ओळख करून देण्यातही मेहता यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. रॉबिन कुक, मायकेल क्रायटन, डॅन ब्राऊन, जेफ्री आर्चर यांच्यासह सुधा मूर्ती, ओशो, गुलजार, ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि सचिन तेंडुलकर यांच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्राचे मराठी अनुवाद वाचकांपर्यंत पोहोचवण्यात संस्थेने महत्त्वाची भूमिका बजावली. ‘मराठी ग्रंथजगत’ हे मासिक आणि ‘मेहता बुक सेलर्स’ ही पुस्तक विक्री साखळीही त्यांनी उभी केली. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा स्वीकार करत भारतातील पहिली डीआरएम सक्षम अस्सल मराठी ई-बुक्स तयार करण्याचा मानही संस्थेला मिळाला. सध्या संस्थेच्या पुस्तकांची संख्या ४,५०० हून अधिक असून दरवर्षी १५० पेक्षा जास्त नवीन पुस्तके प्रकाशित केली जातात.
प्रकाशन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत अनिल मेहता यांनी ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स, नवी दिल्ली’चे उपाध्यक्षपद सलग २० वर्षे सांभाळले. या संस्थेचे ते सक्रिय सदस्यही होते. पुस्तक विक्री करताना वाचक आणि ग्राहकांशी जपलेल्या आपुलकीच्या संबंधांमुळे ‘मेहता बुक सेलर्स’ हे पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पुस्तकप्रेमींसाठी विश्वासाचे नाव बनले. त्यांच्या पश्चात मुलगी शर्मिला, नातू अखिल, साहिल आणि कोमल असा परिवार आहे. पुस्तकांच्या माध्यमातून मराठी वाचकांना देश-विदेशातील साहित्याशी जोडणारे अनिल मेहता यांच्या निधनाने मराठी प्रकाशनविश्वातील एक महत्त्वाचे पर्व संपले आहे.