प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबाला हायकोर्टाचा धक्का

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मुंबई
pradip purnekar
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) दुसऱ्या तपास यंत्रणेकडे सोपवण्याची त्यांच्या कुटुंबीयांची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणात सध्या तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले. तपासात महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित केले जात असून, हत्येमागील मुख्य सूत्रधारांना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता.





या प्रकरणातील मूळ तक्रारदार आणि पूर्णेकर यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे पुरावे तपास यंत्रणेकडून विचारात घेतले जात नसल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला. त्यामुळे सध्याच्या SIT कडून सुरू असलेला तपास दुसऱ्या सक्षम यंत्रणेकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

या याचिकेवर सुट्टीकालीन खंडपीठाचे न्यायमूर्ती अद्वैत सेठना आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने घटनेपासून उलटलेल्या कालावधीचा आणि तपासासाठी उपलब्ध असलेल्या मुदतीचा विचार केला. प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी हत्या झाली असून, घटनेला अद्याप केवळ ३७ दिवस झाले आहेत. तपास पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी तपास यंत्रणेकडे आणखी ४५ दिवसांहून अधिक कालावधी शिल्लक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे या टप्प्यावर तपास दुसऱ्या यंत्रणेकडे सोपवण्यासाठी तातडीच्या हस्तक्षेपाची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, प्रदीप पूर्णेकर हे ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. २९ सप्टेंबर रोजी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांची हत्या झाली. या प्रकरणाचा तपास सध्या विशेष तपास पथकाकडून सुरू असून, आता तपासाची दिशा आणि दोषारोपपत्रात कोणती माहिती समोर येते, याकडे पूर्णेकर कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.