९०४ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी किशोर बियाणी अडचणीत

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
नवी दिल्ली
kishore biyani
सुमारे ९०४.३२ कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फ्युचर रिटेल लिमिटेड आणि प्रसिद्ध उद्योगपती किशोर बियाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात किशोर बियाणी यांचे बंधू राकेश बियाणी यांनाही आरोपी करण्यात आले आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर सीबीआयने शुक्रवारी मुंबईतील बियाणी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणी छापे टाकून झडती घेतली. या कारवाईत तपासाशी संबंधित काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिली.




सीबीआयने ४ नोव्हेंबर रोजी या प्रकरणी गुन्हा नोंदवला होता. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट ब्रँच-३, मुंबई यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी कट रचल्याचा तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा भंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारामुळे तक्रारदार बँकेचे ९०४.३२ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, फ्युचर रिटेल लिमिटेड, कंपनीचे प्रवर्तक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि हमीदार किशोर बियाणी व राकेश बियाणी यांच्यासह काही अज्ञात सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून मुंबईतील विविध ठिकाणी झडती घेण्यात आली.

कर्ज मिळवण्यासाठी कट रचल्याचा आरोप


स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य नऊ बँकांच्या समूहाकडून कर्ज मिळवण्यासाठी आरोपींनी संगनमताने गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. फ्युचर रिटेल लिमिटेड ही कंपनी बिग बाजार, फॅशन अॅट बिग बाजार आणि फूड हॉल यांसारख्या हायपरमार्केट व सुपरमार्केटच्या माध्यमातून किरकोळ व्यापार क्षेत्रात कार्यरत होती. कंपनीच्या स्टोअर्समधून एफएमसीजी आणि फॅशन उत्पादनांचीही विक्री केली जात होती. या कर्ज व्यवहारांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून, त्यासंदर्भात सीबीआयकडून पुढील तपास सुरू आहे.