वॉशिंग्टन,
Diwali celebrations at the White House अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये शनिवारी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह भारतीय वंशाचे अनेक नामवंत उद्योजक, सेलिब्रिटी आणि भारतीय समुदायातील प्रतिष्ठित व्यक्तींनी हजेरी लावली. सोहळ्यात भारतीय टेक उद्योजक आणि गोक्कीचे संस्थापक विशाल गोंडल विशेष आकर्षण ठरले. त्यांनी ट्रम्प यांची भेट घेऊन हनुमान चालीसेची एक प्रत भेट दिली.

कार्यक्रमाला भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा, काश पटेल, अरविंद कृष्णा यांच्यासह अनेक भारतीय-अमेरिकन दिग्गज उपस्थित होते. व्हाइट हाऊसच्या ओव्हल कार्यालयात पारंपरिक पंती लावून मोठ्या दिवाळीचा सण साजरा झाला. गोंडल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये व्हाईट हाऊसमधील दिवाळी उत्सवाचे छायाचित्र जारी करत म्हटले की, ट्रम्प यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे आणि त्यांना हनुमान चालीसेची एक प्रत भेट देणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तुलसीदास यांनी रचलेले हे पवित्र स्तोत्र आपल्यापैकी कोट्यवधी लोक दररोज साहस, भक्ती आणि शक्तीसाठी पठण करतात. दिवाळी सोहळ्याला भारतीय समुदायातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही उपस्थिती लावली. यामध्ये जगप्रसिद्ध मिशेलिन स्टार शेफ विकास खन्ना आणि कॅनडाच्या माजी खासदार रुबी ढाला यांचा समावेश होता. व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीची सजावट करण्याची सुरुवात २००३ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांनी केली होती. त्यानंतर, २००९ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये ही परंपरा पुढे चालू ठेवली. तेव्हापासून, दरवर्षी व्हाईट हाऊसच्या विविध भागांमध्ये भारतीय समुदायासोबत मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली जाते.