आली दिवाळी...संस्कृती, समृद्धी आणि सजगतेचा दीपयोग

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
अरुण म्हात्रे
diwali प्रत्येक भारतीयाला पुलकित करणाऱ्या दिवाळीचे वेध लागताच मनातला तसेच आसमंतातला उत्साह सर्वत्र अनुभवायला मिळू लागतो. अशा वेळी निसर्गरम्य दिवाळीची आठवण करून देणाऱ्या काव्यपंक्ती नकळतच माझ्या मनात उमटतात आणि शब्द होऊन अलगद उतरतात...
 
‘प्राचीवरती फूल तांबडे सजते अंबर..
आणि पसरतो गुलाल दिवसाच्या भाळावर..

लक्ष कळ्यांचा लाल ताटवा झुले नभावर..
जणू केशरी सुरू प्रार्थना तरुशिखरांवर...’
 

diwali 
मला वाटते, दिवाळी केवळ माणसांच्या घरांमध्ये नसते. ती निसर्गाच्या रंगांत, पक्ष्यांच्या किलबिलाटात आणि फुलांच्या बहरातही असते, याची जाणीव निसर्ग आपल्याला त्याच्या बदलत्या रूपातून करून देत असतो. गावाकडच्या दिवाळीत खाण्यापिण्याची चंगळ असे. पांढऱ्या-ज्वारीच्या भाकऱ्या, परसातल्या भाज्या आणि ताजे मासे यांची चव आजही माझ्या जिभेवर रेंगाळते आहे. मुंबईहून वडील शनिवारी गावी येणार म्हणून मी बसस्थानकावर त्यांची वाट पाहात असे. त्यांच्या पिशव्यांमध्ये आमच्यासाठी फटाके, कपडे आणि भेटवस्तू असत. आम्हाला त्याची मोठीच उत्सुकता असे. एका दिवाळीत त्यांनी मोठा रेडिओ आणला. ती माझ्या आयुष्यातली अविस्मरणीय दिवाळी होती. वर्गात पहिला येत असल्यामुळे गावातल्या घरांमध्येही माझे कौतुक होत असे. कुणी हातावर करंजी ठेवत असे, तर कुणी प्रेमाने काही खाऊ ठेवत असे. दिवाळी म्हणजे फराळाबरोबर मिळणारा मायेचा घासही असतो, हे तिथेच उमगले.
सातवीनंतर विक्रोळीच्या टागोरनगरमध्ये आलो. तिथे दिवाळीचे वेगळेच रूप पाहिले. हाऊसिंग बोर्डाच्या ५४ इमारती एकाच पद्धतीच्या कंदिलांनी उजळून निघायच्या. पवईच्या डोंगरावरून ही रोषणाई पाहण्यात वेगळीच मजा होती. त्या दृश्याचं वर्णन करताना शब्द कमीच पडतात.
‘निळेभोर आकाश जणू, वर मंडप मोठा..
आणि फुलांची रंग दिवाळी येता जाता..

इमारतींच्या लक्ष गॅलऱ्या झगमगतात दिव्यांनी..
जणू दिव्यांचे छप्पर उतरे गर्दीच्या रस्त्यांनी’
खरेच, शहरातील दिवाळी म्हणजे दिव्यांनी सजलेला एक भव्य सोहळाच. घराघरांत लाडू, चकली, शंकरपाळे बनत. आमचा आगरी फराळ आणि शेजाऱ्यांचा मालवणी फराळ. आनंद मात्र एकच. दूध वाटपाच्या कामामुळे मराठी, गुजराती आणि दक्षिण भारतीय कुटुंबांशी माझा जिव्हाळा निर्माण झाला. दिवाळीत ते मला फराळासाठी आवर्जून बोलवत असत. दूध पोहोचवणारा मुलगा म्हणून नव्हे, तर घरातलाच एक म्हणून मिळणारे प्रेम हीच माझी खरी कमाई होती.
डोंगरीचा आपलेपणा, हाशिवऱ्याचा निसर्ग आणि विक्रोळीच्या कंदिलांचा प्रकाश या आठवणी आजही मनात तेवत आहेत. आज ठाण्यात राहून दिवाळीचे बदललेले रूप पाहताना या आठवणी अधिक महत्त्वाच्या वाटतात. एका बाजूला मॉलमधला झगमगाट, ब्रँडेड वस्तूंची रेलचेल आणि खरेदीची स्पर्धा आहे. दुसरीकडे दिवाळी पहाट, कवितांचे आणि गाण्यांचे कार्यक्रम यातून सणाचा आनंदाचा सुंदर अनुभव आहे.
मीही निवृत्तीनंतर निवेदन, कविता आणि गाण्यांच्या माध्यमातून लोकांच्या आनंदात सहभागी होतो. काळ बदलला, पद्धती बदलल्या; पण त्या जुन्या आठवणींमधला आपलेपणा आजही मनाला ऊब देतो. आज सोशल मीडियावर दिवाळीचे फोटो टाकणे, शुभेच्छा देणे ही सण साजरा करण्याची नवी पद्धत झाली आहे. त्यात गैर काहीच नाही. तंत्रज्ञानामुळे दूर असलेली माणसेही एकमेकांच्या आनंदात सहभागी होऊ शकतात. मात्र दिवाळी म्हणजे केवळ सुंदर कपडे घालून, घर सजवून फोटो काढणे आणि जगाला दाखवणे एवढेच नाही. आपल्या माणसांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे, फराळाचा आस्वाद घेत नात्यांमधला जिव्हाळा वाढविणे यांनाही तितकेच महत्त्व आहे.
मला वाटते की, दिवाळीच्या परंपरांमागचा अर्थ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणेही तितकेच गरजेचे आहे. नरकचतुर्दशीची कथा वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण करून देते. वसुबारस प्राणिमात्रांविषयीची कृतज्ञता आणि निसर्गाशी असलेले आपले नाते अधोरेखित करते. केवळ पूजा, शुभेच्छा आणि सोशल मीडियावरील संदेश यापुरत्या परंपरा मर्यादित नाहीत. त्यामागची मूल्ये मुलांच्या मनात रुजवण्यासाठी घरातील ज्येष्ठांनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. परंपरा पुढे नेणे म्हणजे केवळ विधींची पुनरावृत्ती नव्हे, तर त्यातील जीवनमूल्ये नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे. रांगोळी, पणत्या, आकाशकंदील आणि फटाके हे दिवाळीचे पारंपरिक घटक आहेत. त्यांच्याशी आपल्या आठवणी आणि भावनाही जोडलेल्या आहेत. मात्र आज प्रदूषण, पाण्याची टंचाई आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर आव्हाने आपल्यासमोर आहेत.
‘कळते आहे, दीपावलीवर सावट दुष्काळाचे
दु:ख आहे हे आपल्यास्तव, श्रमणाऱ्या बळीराजाचे

उधळू नका हो उगाच पैसे दिवाळीच्या कैफात
दुष्काळाशी लढणाऱ्यांना देऊ थोडा हात...’
दिवाळीचा आनंद साजरा करताना सामाजिक बांधिलकी विसरून चालणार नाही. यंदा दुष्काळाचं सावट असताना पाणीटंचाईचा प्रश्न विशेष गांभीर्याने समजून घेण्याची गरज आहे. कोकणातले पावसाचे पाणी समुद्रात मिसळून जाते. मराठवाड्यात पाण्यासाठी वणवण करावी लागते. या विरोधाभासावर विचार करून पावसाचे पाणी अडवणे-जिरवणे, शेततळी आणि लहान बंधारे उभारणे, जुन्या तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि घरांमध्ये पावसाचे पाणी साठवणे अशा उपायांना प्राधान्य द्यायला हवे. पाण्याचा काटकसरीने वापर आणि गावपातळीवरील जलनियोजन ही केवळ शासनाची नव्हे, तर समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आहे. सणाच्या निमित्ताने केवळ तात्पुरती मदत करण्यापलीकडे जाऊन अशा समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी लोकसहभाग वाढविणे आवश्यक आहे.
मी दिवाळीमध्ये एका संस्थेच्या माध्यमातून सुधागड परिसरातील आदिवासी बांधवांपर्यंत फराळ घेऊन जातो. बालसुधारगृहातील मुलांसाठी गाणी म्हणतो. वृद्धाश्रमातही कार्यक्रम करतो. माझ्या कलेतून आणि दिलेल्या वेळेतून कुणाच्या चेहऱ्यावर हसू फुलत असेल, तर तोच दिवाळीचा खरा आनंद आहे. आपल्या आनंदात दुसऱ्यालाही सहभागी करून घेण्याची भावना कृतीतून व्यक्त झाली, तर सणाचे समाधान कितीतरी पटींनी वाढते. गरजूंच्या घरात फराळ पोहोचवणे, एकट्या पडलेल्या ज्येष्ठांना वेळ देणे, वंचित मुलांसोबत आनंदाचे क्षण घालवणे किंवा निसर्गाच्या संवर्धनासाठी हातभार लावणे, या प्रत्येक कृतीमध्ये एक पणती उजळवण्याची ताकद आहे.
माझ्या मते, आजच्या दिवाळीत तीन मूल्यं जपली पाहिजेत- संयम, कृतज्ञता आणि माणुसकी. खरेदीच्या स्पर्धेत सहभागी होण्यापेक्षा गरजेपुरती खरेदी करून उरलेले पैसे गरजू कुटुंबांसाठी किंवा दुष्काळग्रस्तांसाठी वापरता येतील. झाडे तोडून, डोंगर उद्ध्वस्त करून आणि नद्या प्रदूषित करून साजरी होणारी दिवाळी नको. माझ्या बालपणीची हिरवाई, पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांची सळसळ पुढच्या पिढ्यांनाही अनुभवता यायला हवी. आपण निसर्गाकडून घेतो, त्याबद्दल कृतज्ञ राहून त्याच्या जतनासाठीही काही केले पाहिजे. खरी दिवाळी केवळ दिव्यांच्या रोषणाईत नाही, तर माणसामाणसांत जपलेल्या प्रेमात, निसर्गाविषयीच्या कृतज्ञतेत आणि वाटून घेतलेल्या आनंदात असते. परंपरेचा प्रकाश जपत माणुसकीचा सुगंध सर्वदूर पसरवणारी दिवाळी आपण साजरी करूया. ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, पर्यावरणपूरक आणि माणुसकीने उजळलेली होवो, हीच मनापासून सदिच्छा.
 
(लेखक कवी आणि व्याख्याते आहेत)