मुंबई
best-bus मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बेस्ट बससेवेबाबत एक दिलासादायक अपडेट समोर येत आहे. बसमधून प्रवास करताना तिकिटासाठी रोख रक्कम देण्याऐवजी आता थेट UPI द्वारे पैसे भरण्याची सुविधा सुरू करण्याच्या हालचाली बेस्ट प्रशासनाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. यासंदर्भात प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. ही सुविधा प्रत्यक्षात सुरू झाल्यास प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी रोख रक्कम जवळ बाळगण्याची आवश्यकता राहणार नाही.
सध्या बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या समस्येला सामोरे जावे लागते. प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसणे किंवा बस वाहकाकडे परत देण्यासाठी सुट्टे उपलब्ध नसणे, यामुळे अनेकदा प्रवासी आणि वाहक यांच्यात वादाचे प्रसंग निर्माण होतात. दैनंदिन प्रवासात वारंवार उद्भवणारी ही समस्या लक्षात घेऊन डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून देण्याचा विचार बेस्ट प्रशासनाकडून केला जात आहे.
प्रस्तावित सुविधेनुसार प्रवाशांना फोनपे, गुगल पे आणि पेटीएम यांसारख्या UPI अॅपच्या माध्यमातून तिकिटाचे पैसे भरता येऊ शकतील. यासाठी बसमध्ये QR कोड उपलब्ध करून दिला जाण्याची शक्यता आहे. प्रवाशांना हा कोड मोबाईलवरून स्कॅन करून आवश्यक तिकिटाचे पैसे थेट डिजिटल पद्धतीने भरता येतील. त्यामुळे रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.
मात्र, ही सुविधा नेमकी कधीपासून सुरू होणार, याबाबत अद्याप अधिकृत कालमर्यादा किंवा सविस्तर माहिती समोर आलेली नाही. प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणीबाबत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ही सुविधा सुरू झाल्यास मुंबईकरांचा बेस्ट बसमधील प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच सुट्ट्या पैशांवरून होणारे वादही कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे बेस्टच्या या प्रस्तावाकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.