रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार अमेरिकेत ताब्यात!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
कॅलिफोर्निया,
Harry Boxer in custody in the United States अमेरिकेत लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गुंड हॅरी बॉक्सर याला ताब्यात घेण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिलेल्या माहितीच्या आधारे अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. हॅरी बॉक्सर याच्यावर हत्या, धमकावणे आणि खंडणी वसूल करण्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. विशेष म्हणजे, बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीही त्याने स्वीकारली होती. अमेरिकेत राहून तो आपल्या टोळीच्या कारवाया चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) या यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी कॅलिफोर्निया येथून त्याला ताब्यात घेतले.
 
dwre4
 
 
रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर १ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. हल्लेखोरांनी शेट्टी टॉवरच्या बाहेर अनेक गोळ्या झाडल्या होत्या. घटनेच्या वेळी रोहित शेट्टी घरातच उपस्थित होते. मात्र, या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नव्हती. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. शुभम लोणकर, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर आणि हरमन संधू यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला होता. याशिवाय, हॅरी बॉक्सरने सोशल मीडियावरील पोस्ट आणि ऑडिओ संदेशांच्या माध्यमातून बॉलिवूडमधील काही व्यक्तींनाही धमकावले होते.
 
 
हॅरी बॉक्सरच्या अटकेपूर्वी लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित हिमांशू भाऊ आणि नीरज फरीदपुरिया यांनाही अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले होते. या दोघांविरोधातही भारतात अनेक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. परदेशात वास्तव्यास राहून भारतातील गुन्हेगारी कारवाया चालवणाऱ्या गुंडांविरोधात तपास यंत्रणांकडून कारवाईचा वेग वाढवण्यात आला आहे. अमेरिका, युरोपसह विविध देशांमध्ये आश्रय घेऊन भारतातील टोळ्यांचे नेटवर्क चालवणाऱ्या गुन्हेगारांवर भारतीय तपास यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.