गाझियाबाद
High alert on all borders of UP उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील इंदिरापूरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वसुंधरा पोलीस चौकीच्या परिसरात झालेल्या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे आणि कोणी घडवून आणला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. दरम्यान, एका मुस्लिम संघटनेने सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करून या घटनेची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासात अद्याप संशयास्पद वस्तू किंवा ठोस पुरावा हाती लागलेला नाही. घटनेच्या वेळी चौकीतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने संशयित व्यक्तीची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. तपासादरम्यान पोलिसांना एका संशयित दुचाकीबाबत माहिती मिळाली असून, तिचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाच्या (UP ATS) अधीक्षक प्रीती बाला गुप्ता आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. उपनिरीक्षक निशांत हे एटीएसच्या पथकाचे नेतृत्व करत आहेत. पोलीस आयुक्तही घटनास्थळी उपस्थित असून, बॉम्बशोधक व निकामीकरण पथक तसेच श्वानपथकाकडून तपासणी सुरू आहे. गाझियाबादमधील या घटनेनंतर उत्तर प्रदेशातील सर्व सीमांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्ती भागात वाहनांची कसून तपासणी करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, या स्फोटात रासायनिक पदार्थांचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिसांच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. रात्री घटनास्थळी पोहोचलेल्या बॉम्बशोधक पथकाला स्फोटाचे कोणतेही ठोस अवशेष आढळले नसल्याने ही शक्यता वर्तवली जात आहे. स्फोटानंतर रासायनिक पदार्थ पूर्णपणे नष्ट झाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
वसुंधरा पोलीस चौकीची स्थापना ५ जुलै २००५ रोजी करण्यात आली होती. शुक्रवारी, ६ नोव्हेंबरच्या रात्री अचानक झालेल्या स्फोटामुळे चौकीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, तर एसीचेही नुकसान झाले. याशिवाय चौकीतील फर्निचरची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. स्फोटाच्या वेळी चौकीत जेवण पोहोचवण्यासाठी आलेला एक डिलिव्हरी बॉय जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. सुदैवाने या घटनेत चौकीतील सर्व पोलीस कर्मचारी सुरक्षित आहेत. स्फोटामागील कारण आणि त्यात सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.