कार्तिक आर्यन-कबीर खान पुन्हा एकत्र

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मुंबई
kartik aaryan
अभिनेता कार्तिक आर्यन आणि दिग्दर्शक कबीर खान ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘चंदू चॅम्पियन’ या चित्रपटाच्या यशानंतर दोघेही आता ‘लडाकू’ या नव्या चित्रपटासाठी एकत्र काम करत आहेत. विशेष म्हणजे, या प्रोजेक्टसाठी अनन्या बिर्ला यांच्या बिर्ला स्टुडिओजनेही पुढाकार घेतला आहे. या चित्रपटाच्या जगभरातील चित्रपटगृहांमधील प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली असून, १८ जून २०२७ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


‘लडाकू’ची निर्मिती बिर्ला स्टुडिओज, कबीर खान एंटरटेनमेंट आणि डोपामाइन स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने कार्तिक आर्यन प्रथमच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. त्यामुळे अभिनयासोबतच निर्माता म्हणूनही त्याची नवी सुरुवात पाहायला मिळणार आहे. महत्त्वाकांक्षा, संघर्ष, जिद्द आणि आशावाद यांचा संगम असलेली ही कथा सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘चंदू चॅम्पियन’मधील कार्तिक आर्यनच्या अभिनयाचे आणि कबीर खान यांच्या दिग्दर्शनाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते. आता ही जोडी नव्या विषयासह पुन्हा एकत्र येत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ‘लडाकू’ हा २०२७ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘बजरंगी भाईजान’ आणि ‘83’ यांसारख्या चित्रपटांतून भावनिक आणि प्रभावी कथा पडद्यावर मांडणारे कबीर खान यावेळीही प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी अनुभव घेऊन येणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत स्वतःच्या इच्छाशक्तीच्या बळावर यश संपादन करणाऱ्या नायकाचा प्रवास या चित्रपटात उलगडणार आहे. संघर्षातून उभारी घेण्याची प्रेरणा देणारी ही कथा संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून पाहता येईल, अशा मनोरंजक स्वरूपात मांडण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.

एकीकडे कार्तिक आर्यनचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पण आणि दुसरीकडे कबीर खान यांचे दिग्दर्शन, यामुळे ‘लडाकू’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता १८ जून २०२७ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक त्याला कितपत पसंती देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.