शेतीला मिळणार कॉर्पोरेट बळ

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
पुणे
krishi sankalp project
शेतीवर आधारित उत्पादक कंपन्यांना अधिक सक्षम करण्यासाठी ‘बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’ने (बाएफ) ‘वॉलमार्ट फाउंडेशन’च्या सहकार्याने ‘कृषी संकल्प’ प्रकल्पाचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. या टप्प्यात २० शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट सहकार्य करण्यात येणार असून, अन्य ३९ कंपन्यांना मार्गदर्शन आणि आवश्यक मदत पुरवली जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून २४ हजार ३३० आदिवासी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. ‘बाएफ’ने निवेदनाद्वारे ही माहिती दिली.




दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता वाढवणे, त्यांना बाजारपेठांशी जोडणे आणि या प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधिक मजबूत करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पालघर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांतील सात शेतकरी उत्पादक कंपन्यांना मार्गदर्शन व मदत करण्यात आली होती. तसेच उत्पादनवाढ, पीक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण आणि क्षमता बांधणीच्या माध्यमातून १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शेती, फलोत्पादन, फुलशेती, जलस्रोत विकास आणि पशुधनावर आधारित उपजीविकेच्या साधनांविषयी माहिती देण्यात आली.

महिला शेतकऱ्यांच्या सहभागाला प्राधान्य

‘कृषी संकल्प’च्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या नेतृत्वाखाली ‘भाग्यमय मिल्क प्रोड्युसर कंपनी’ची स्थापना करण्यात आली. तसेच जव्हार येथे काजू प्रक्रिया केंद्र सुरू करण्यात आले, तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दूध प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाले. या अनुभवांच्या आधारे दुसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील महिला भागधारकांचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा अधिक करण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर कंपन्यांच्या संचालक मंडळांवर महिलांना किमान ५० टक्के प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालील संस्थांना सक्षम करणे, उपजीविकेच्या संधी वाढवणे आणि महिलांचा सहभाग बळकट करणे यांचे महत्त्व अधोरेखित झाले. दुसऱ्या टप्प्यात याच अनुभवांच्या आधारे अधिक टिकाऊ उपजीविकांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ‘बाएफ’चे अध्यक्ष डॉ. भरत काकडे यांनी सांगितले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक स्थिर आणि शाश्वत उपजीविका उभारण्यासाठी सक्षम शेतकरी संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. विशेषतः महिलांचा वाढता सहभाग आणि नेतृत्व यांमधून ‘कृषी संकल्प’ प्रकल्पाची प्रगती दिसून येत असल्याचे वॉलमार्टचे सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभाव सल्लागार निशांत गुप्ता यांनी नमूद केले.