मुंबई
maharashtra fda दिवाळीच्या सणासुदीच्या काळात नागरिकांच्या अन्नसुरक्षेशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवत प्रशासनाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत शंभरहून अधिक दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, अनेक नामांकित ब्रँड आणि क्विक कॉमर्स कंपन्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या कारवाईची राज्यभर चर्चा रंगली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी राज्यभर विशेष तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान मुंबईतील २८ दुकानांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये झेप्टो आणि ब्लिंकिट या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मचाही समावेश आहे. मुंबईसह पुणे, अमरावती आणि कोकणातील विविध भागांत प्रशासनाच्या पथकांनी तपासणी केली. बोरिवली येथील एका बिर्याणी सेंटरमध्येही नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळल्याने संबंधित आस्थापनेवर कारवाई करण्यात आली.
भंडारा जिल्ह्यातही अन्नसुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. येथील कारवाईत तब्बल ८ लाख ५९ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नऊ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर ६८ पेढ्यांच्या दुकानांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करत ४४ पेढ्यांच्या दुकानांना एकूण सुमारे तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला.
दरम्यान, नाशिकमध्ये अन्नपदार्थांबरोबरच औषधांच्या गुणवत्तेच्या आणि वैद्यकीय नियमांच्या उल्लंघनाचाही गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. टक्कल पडलेल्या ठिकाणी पुन्हा केस उगवण्याची हमी देणाऱ्या दाव्यांमागील वास्तव एफडीएच्या कारवाईत समोर आले. नाशिकमधील कॉलेज रोड परिसरात असलेल्या व्हीएस न्यू फॅशन झोनवर औषध विभागाने छापा टाकला. विनापरवाना औषधनिर्मिती आणि बेकायदेशीर शस्त्रक्रिया सुरू असल्याचे या कारवाईत उघड झाले.
संबंधित आस्थापनेकडून टक्कल असलेल्या व्यक्तींच्या डोक्यावर हमखास केस उगवतात, अशा आशयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले जात होते. मात्र, प्रत्यक्ष तपासणीत कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तीळ आणि चामखीळ काढण्यासाठी बेकायदेशीर शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे आढळले. या कारवाईदरम्यान सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामध्ये बनावट हेअर ऑइलचाही समावेश असून, त्याचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नाशिकमध्ये एफडीएने यापूर्वीही मिठाई आणि फरसाण विक्रेत्यांविरोधात कारवाई केली होती. त्यानंतर आता निकृष्ट दर्जाचे मोतीचूर लाडू तयार करणाऱ्या आस्थापनेवरही कारवाई करण्यात आली आहे. 'सण-उत्सव विशेष मोहीम २०२६' अंतर्गत श्री बालाजी लाडू या आस्थापनेची तपासणी करण्यात आली. यावेळी लाडू तयार करण्याची जागा अस्वच्छ असल्याचे आढळले. तसेच मोतीचूर लाडूंमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात अन्नरंग वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
या तपासणीनंतर ६४ हजार ५०० रुपये किमतीचा तब्बल २५८ किलो मोतीचूर लाडूंचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित आस्थापनेचे नोंदणी प्रमाणपत्रही तातडीने निलंबित करण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात मिठाई, फरसाण आणि इतर खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात एफडीएने कारवाई तीव्र केली आहे. राज्यभरातील या मोहिमेमुळे अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या आस्थापनांचे धाबे दणाणले आहेत.