अनुभवायला मिळावी सर्वस्पर्शी दिवाळी!

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
मेधा इनामदार

diwali दिवाळीच्या प्रकाशात प्रत्येक घर उजळते. दारापुढील रांगोळ्या, पणत्यांची आरास, फराळाचा दरवळ आणि लक्ष्मीपूजनाची मंगल तयारी वातावरणात चैतन्य निर्माण करते. लक्ष्मीच्या स्वागतासाठी घर सजते. तिजोरीतील धनाची पूजा होते आणि वर्षभर सुखसमृद्धी नांदावी, अशी प्रार्थना केली जाते. बलिप्रतिपदेच्या निमित्ताने पाडव्याचा आनंद साजरा होतो. भेटवस्तू, औक्षण आणि पती-पत्नीच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीतून नात्यांना नवा उजाळा मिळतो. दोन्ही दिवसांच्या या परंपरा सुंदर आहेत. मात्र हे सण म्हणजे केवळ परंपरा नव्हेत, तर त्यामागे एक समृद्ध जीवनदृष्टी आहे.

diwali1
लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ धनाची पूजा नव्हे. तर धनाच्या निर्मितीमागील श्रमांचा सन्मान आणि त्याच्या विनियोगातील विवेकाचा स्वीकार आहे. ज्या घरात अन्नाचा आदर, स्त्रीचा सन्मान, नात्यात विश्वास, व्यवहारात प्रामाणिकपणा आणि मनात समाधान नांदते, तिथेच लक्ष्मीचा खरा वास असतो. लक्ष्मी म्हटले की धन, सुवर्ण, वैभव आणि ऐश्वर्य यांचे चित्र आपल्या मनात उभे राहते. मात्र भारतीय संस्कृतीत लक्ष्मीची संकल्पना अधिक व्यापक आहे. धनलक्ष्मीबरोबर धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, आरोग्यलक्ष्मी, विजयलक्ष्मी, गृहलक्ष्मी ही तिची विविध रूपे आहेत. घरात अन्नधान्याची रेलचेल, निरोगी शरीर, ज्ञानामुळे समृद्ध झालेले ठाम, स्पष्ट आणि कल्याणमय विचार, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, मनात असलेले समाधान आणि कुटुंबात असलेले प्रेमाचे वातावरण हीदेखील लक्ष्मीचीच रूपे आहेत.
पैसा माणसाला अनेक सुविधा देतो. पण सुखाची हमी देत नाही. मोठे घर, महागड्या वस्तू आणि भरलेली तिजोरी यांच्याबरोबरच घरात मोकळेपणा, जिव्हाळा आणि परस्परांचा विश्वास असणेही आवश्यक आहे. संपत्ती वाढत असताना मनाची श्रीमंती कमी होत असेल, नात्यांमध्ये दुरावा वाढत असेल आणि समाधान हरवत असेल तर ते वैभव अपूर्णच राहते. खरी समृद्धी संपत्तीमुळे जीवनात निर्माण होणाऱ्या सुंदरपणात, सुरक्षिततेत आणि आनंदात आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धनाबरोबर आरोग्य, ज्ञान, समाधान आणि नात्यातील जिव्हाळा आणि प्रेम या जाणीवांचीही पूजा व्हायला हवी. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नाणी, दागिने, हिशेबाच्या वह्या आणि व्यवसायातील साधनांची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेच्या वेळी धनाला पवित्र मानताना ते मिळविण्याच्या मार्गातील नैतिकताही जपली गेली पाहिजे, याची जाणीव मनात रुजायला हवी. संपत्तीचे पावित्र्य तिच्या संख्येने नव्हे तर निर्मितीतील प्रामाणिकपणाने आणि वापरातील विवेकाने ठरते.
आजच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत या विचाराला विशेष महत्त्व आहे. महागाईने सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कटले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, शिक्षण आणि आरोग्यावरील वाढता खर्च यामुळे उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ राखणे कठीण होत आहे. पावसाची अनिश्चितता, पाणीटंचाई आणि दुष्काळाचे सावट यामुळे शेतकरीवर्ग असुरक्षिततेच्या छायेत आहे. एका बाजूला बाजारपेठेतील झगमगाट, संपत्तीचे प्रदर्शन आणि उपभोगवाद वाढतो आहे, तर दुसऱ्या बाजूला अन्न, पाणी आणि रोजगारासाठी संघर्ष करणारा समाजघटक आहे. सामाजिक अस्वस्थता, वाढता स्वार्थ आणि राजकीय क्षेत्रातील उथळ सत्ताकेंद्रित कुरघोड्यांमुळे सार्वजनिक जीवनातील विश्वासाला तडे जात आहेत. अशा परिस्थितीत लक्ष्मीपूजनाची प्रार्थना केवळ वैयक्तिक धनवृद्धीऐवजी आर्थिक स्थैर्य, श्रमाला प्रतिष्ठा, न्याय्य संधी आणि सर्वसमावेशक विकास अशा समृद्ध समाजासाठी असायला हवे. गरजू व्यक्तीला मदतीचा हात देणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे, अडचणीत असलेल्या कुटुंबाला आधार देणे किंवा निराधाराच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणे यातून लक्ष्मीचे अधिक उदात्त रूप प्रकट होते. संपत्तीचा सर्वोच्च उपयोग तिच्या साठवणुकीत नसून तिच्यामुळे दुसऱ्याच्या जीवनात निर्माण होणाऱ्या सकारात्मक बदलात असतो.
लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जातो. मात्र या स्वच्छतेला मनाच्या स्वच्छतेची जोड मिळणेही आवश्यक आहे. भारतीय पुराणपरंपरेत लक्ष्मीच्या विरोधी संदर्भात अलक्ष्मीची संकल्पना येते. कलह, दारिद्र्य, अस्वच्छता, आळस आणि नकारात्मकता यांच्याशी तिचे नाते जोडले गेले आहे. आजच्या जीवनात या संकल्पनेचा अर्थ अधिक व्यापकपणे समजून घेता येतो. लोभ, मत्सर, अहंकार, द्वेष आणि स्वार्थ यामुळे घरातील शांतता नष्ट होते. सततचे वाद, अपमान आणि अविश्वास यातून नात्यांचे वैभव झाकोळते. बाहेरून सजलेले घर आणि आतून अस्वस्थ असलेली मने यात खरी समृद्धी असू शकत नाही. त्यामुळे लक्ष्मीपूजन म्हणजे मनातील कटुता, विचारांमधील संकुचितपणा आणि व्यवहारातील स्वार्थ दूर करण्याचाही संकल्प असायला हवा.
लक्ष्मीपूजनानंतर येणारा पाडवा बलिप्रतिपदेच्या रूपाने दानशीलता आणि उदारतेचा विचार पुढे आणतो. राजा बळी हा पराक्रमी, दानशूर आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून पुराणकथांमध्ये स्मरणात आहे. वामनावतारातील प्रसंगात त्याने दिलेल्या वचनाला जागून सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दाखवली. या कथेत दानाबरोबरच वचनपालन, विनम्रता आणि सत्तेच्या अभिलाषेपेक्षा मूल्यांना दिलेले महत्त्वही आहे. मोठेपण केवळ अधिकार, संपत्ती किंवा सामर्थ्याने सिद्ध होत नाही. आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा उपयोग इतरांच्या कल्याणासाठी करण्याची वृत्तीच खऱ्या मोठेपणाची खूण ठरते.
आज बळी राजाचा संदर्भ शेतकऱ्यांशी जोडला जातो. दुष्काळ, महागाईच्या झळा आणि कोरड्या आभाळाने या बळीराजांचे जगणे असह्य झाले आहे. आत्महत्येकडे वळणारा शेतकरी हे महाराष्ट्राचे चटका लावणारे वास्तव झाले आहे. म्हणूनच बळीराजाच्या उदार विचारांना आजच्या काळात नवा संदर्भ द्यायला हवा. समाजातील वंचितांना संधी उपलब्ध करून देणे, गरिबांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी मदत करणे, दुर्बल घटकांना स्वावलंबी बनवणे आणि आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांच्या प्रगतीसाठी करणे, ही आधुनिक दानशीलता आहे. दान म्हणजे केवळ संपत्तीचे दान नव्हे, तर स्वतःच्या क्षमतेचा, अस्तित्वाचा आणि कष्टाचा काही भाग समाजासाठी खुला करणेही आहे. आपल्या घरातील आनंद समाजाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवण्याची वृत्ती बलिप्रतिपदेच्या परंपरेला आजच्या काळाशी जोडते.
महाराष्ट्रात पाडवा पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि परस्पर सन्मानाचा दिवस म्हणूनही विशेष महत्त्वाचा आहे. औक्षण करणे, भेटवस्तू देणे आणि पत्नीबद्दल प्रेम व्यक्त करणे या परंपरेमागे सहजीवनाचा आनंद आहे. मात्र या उत्सवाचा अर्थ एका दिवसाच्या भेटवस्तूंपुरता मर्यादित राहू नये. संसार उभा राहताना दोघांचेही श्रम, त्याग, समजूतदारपणा आणि जबाबदाऱ्या महत्त्वाच्या असतात. पत्नीच्या कष्टांचा, तिच्या स्वप्नांचा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा सन्मान करणे, तसेच पतीच्या कष्टांची, भावनांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणे अधिक महत्वाचे. पाडव्याचा खरा गाभा याच परस्परआदरात आहे. महागड्या भेटींपेक्षा एकमेकांसाठी राखून ठेवलेला वेळ, मनमोकळा संवाद, मतभेदांमध्येही जपलेला सन्मान आणि संकटात दिलेली साथ हीच बलिप्रदेची खरी परंपरा आहे.
आज सणांच्या साजरीकरणात खरेदी, सजावट आणि प्रदर्शन यांचे प्रमाण वाढले आहे. समाजमाध्यमांवरील झगमगाटामुळे सणांचा आनंदही म्हणजे केवळ प्रदर्शन बनले आहे. आर्थिक क्षमतेपेक्षा अधिक खर्च करून, कर्ज काढून किंवा केवळ प्रतिष्ठेसाठी महागड्या वस्तूंची खरेदी करून सण साजरा करण्याची गरज नाही. आपल्या ऐपतीनुसार, पर्यावरणाचा विचार करून आणि इतरांच्या आनंदात सहभागी होत सण साजरा करणे अधिक अर्थपूर्ण आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ संपत्तीचे प्रदर्शन नाही. किंबहुना, संपत्तीचा सन्मान आणि योग्य विनियोग शिकवणारी ती पूजा आहे. तर पाडवा म्हणजे पती-पत्नीच्या नात्यांचे मोल जाणण्याचा दिवस आहे.
दिवाळीचा प्रकाश घराबरोबरच आपले विचारही उजळवतो, तेव्हाच रोषणाईला खरा अर्थ तेव्हाच प्राप्त होतो. लक्ष्मीपूजन आपल्याला प्रामाणिक कमाई, विवेकपूर्ण उपभोग, श्रमांचा सन्मान आणि सामाजिक संवेदनशीलता शिकवते, तर पाडव्याचा सण उदारता, सहजीवन, परस्परआदर आणि नव्या संकल्पांची प्रेरणा देतो. या दोन्ही दिवसांचा संदेश एकमेकांपासून वेगळा नाही. संपत्तीने जीवनाला साधने मिळतात. पण त्या साधनांना अर्थ आपणच द्यावा लागतो. त्यामुळेच या दिवाळीच्या दिव्यांनी केवळ घराचे कोपरे उजळू नयेत, तर आपल्या विचारांतील अंधारही दूर व्हावा. लक्ष्मीपूजनातून धनाला पावित्र्य लाभावे आणि पाडव्याच्या मंगल क्षणी नात्यांना नव्या विश्वासाची पालवी फुटावी. समृद्धीचा प्रकाश आपल्या उंबरठ्यापुरता मर्यादित न राहता दुसऱ्याच्या आयुष्यातही आनंदाचे दीप उजळवणारा ठरावा. कारण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच साजरी होते, जेव्हा घराघरांत दिव्यांसोबत समाधानाचे दीप प्रकाशमान होतात.