५ गोळ्या झाडल्या, सात लागल्या; टेक महिंद्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या

    दिनांक :07-Nov-2026
Total Views |
फरीदाबाद,
Murder of a senior executive at Tech Mahindra हरियाणातील फरीदाबाद येथे पार्किंगच्या वादातून एका मोठ्या आयटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. टेक महिंद्रा कंपनीचे आशिया प्रमुख परमजीत धनखड असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या रात्री सेक्टर-२१ सी परिसरात ही घटना घडली. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मोनू शर्मा याने आपल्या परवानाधारक पिस्तुलातून परमजीत यांच्यावर अंदाजे १५ गोळ्या झाडल्या. त्यापैकी सात गोळ्या परमजीत यांना लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. इमारतीच्या तळमजल्यावर परमजीत वास्तव्यास होते. पार्किंगच्या कारणावरून दोघांमध्ये झालेला वाद अखेर जीवघेण्या हल्ल्यात रूपांतरित झाला. घटनेची माहिती मिळताच सूरजकुंड पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखा आणि न्यायवैद्यक तपास पथक घटनास्थळी दाखल झाले.
 
 
 
3255668
 
परमजीत धनखड हे आपल्या कुटुंबासह सिंगापूरमध्ये वास्तव्यास होते. भाच्याच्या विवाह सोहळ्यासाठी ते ५ नोव्हेंबर रोजी भारतात आले होते. त्यांचा भाचा २४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार होता. दरम्यान, दोन्ही कुटुंबांमध्ये यापूर्वीही कुत्र्याला फिरवण्यावरून आणि वाहनांच्या पार्किंगवरून वाद झाले होते. यासंदर्भात पोलीस ठाण्यात यापूर्वी तक्रारीही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी रात्री व्यायामशाळेतून परतल्यानंतर परमजीत यांनी मोनूला वाहन हटवण्यास सांगितले. यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या मोनूने परवानाधारक पिस्तुलातून परमजीत यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या वेळी परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
गोळीबारानंतर आरोपी मोनू शर्मा आपल्या कुटुंबीयांसह घटनास्थळावरून फरार झाला. परमजीत यांचे पुत्र शौर्य यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना गोळ्यांच्या रिकाम्या पुंगळ्या आढळल्या आहेत. परमजीत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी मोनू शर्माविरोधात गुन्हा दाखल केला असून, फरीदाबाद पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके त्याचा शोध घेत आहेत. किरकोळ कारणांवरून सुरू झालेला शेजाऱ्यांमधील वाद इतका टोकाला गेल्याने या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.